मोदींच्या स्मार्ट सायकलींवर शिवसैनिक ‘सुसाट’
- इंधन दरवाढीच्या निषेधार्त जोरदार घोषणाबाजी
- मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला फासला हरताळ
पिंपरी | प्रतिनिधी
पेट्रोल-डिजेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी पिंपरी-चिंचवड शहरात सायकल रॅली काढली. विशेष म्हणजे मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटीतील सायकली वापरून शिवसैनिकांनी रॅलीद्वारे भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीचा धिक्कार करत ‘पेट्रोल-डिझेल शंभरीपार, हेच का अच्छे दिन’ असा सवाल आंदोलकांनी केंद्र सरकारला केला.
पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात फिनोलेक्स चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. युवा सेना मावळ लोकसभा विस्तारक राजेश पळसकर, पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, रूपेश कदम, राजेंद्र तरस, युवती सेनेच्या प्रतीक्षा घुले, माउली जगताप, नीलेश हाके यांच्यासह युवा सैनिक यामध्ये सहभागी झाले होते.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविताना ‘हेच का अच्छे दिन?’ असा सवाल करणारे फलक रॅलीमध्ये झळकवण्यात आले. इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असून, महागाई वाढली आहे. ‘अच्छे दिन’चा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले आहे. तसेच, केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.