अजित गव्हाणे यांनी आज स्वीकारला पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाचा पदभार

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज शहराध्यक्ष पदाचा पदाभार स्वीकारला. खराळवाडीतील पक्षकार्यालयात मावळते अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी गव्हाणे यांना शहराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविले.   

शहराध्यक्ष गव्हाणे यांच्यासोबत समन्वयक व मुख्य प्रवक्ता योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनीही पदभार स्वीकारला. पार्टी कार्यालयाच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी शहराध्यक्ष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने काम करण्याचा निश्चय केला.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, “शरद पवार साहेब, अजितदादा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करत असताना पक्षाने माझ्यावर शहराची जबाबदारी दिली. महापालिकेतील भाजपची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकण्यासाठी चोवीस तास काम करणार.

संजोग वाघेरे म्हणाले, “अजितदादांवर निष्ठा असलेला, दादांना आवडणार, महापालिकेत वचक असलेला, उद्योग, व्यवसायात शहराध्यक्ष गव्हाणे आघाडीवर आहेत. आगामी निवडणुकीत 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे शहराध्यक्ष यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणार आहोत”

योगेश बहल म्हणाले, आम्ही सर्व वरिष्ठ नेते मंडळी एकजुटीने अजित गव्हाणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही”.

युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवर नाही. मागील पाच वर्षे माझे पक्ष संघटनेतील काम पाहून अजितदादा, शहरातील पक्ष नेतृत्वाने मला संधी दिली. या संधीचे मी नक्कीच सोने करेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले. तर, नगरसेवक पंकज भालेकर यांनी आभार मानले.

Share to