शाहूश्रृष्टीचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते भूमीपूजन
पिंपरी | महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथील केएसबी चौकात साकारण्यात येणा-या शाहूश्रृष्टीच्या कामाचे भूमिपूजन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते आज मंगळवारी (दि. 23) झाले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, मारुती भापकर आदी उपस्थित होते.66
शाहूनगर येथील अडीच एकर जागेवर हे उद्यान विकसित होणार आहे. शाहू सृष्टीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देणारे प्रतिबिंब असेल. सामाजिक बदल घडवण्यासाठी महाराजांनी विविध क्षेत्रात दिलेले योगदान यात दाखवले जाणार आहे. लँडस्केप थीममध्ये मोकळ्या वाहत्या जागांची निर्मिती, महाराजांच्या जीवन आयामाचा आदर करणारी शिल्पे असलेली विविध लहान जागांद्वारे जोडली जातील. मोठा तलाव असेल ज्यामध्ये 2 हत्तींची शिल्पे ठेवली जातील. हत्तींची लढाई एक खेळप्रेम असल्याचे चित्रित केले जाईल. दोन लढाऊ कुस्तीपटू सुदृढ समाजासाठी खेळाला चालना देण्यासाठी दिलेल्या योगदानाचे चित्रण असेल. शेती करणारे बैल, सुतार यांच्यासह कृषी उपकरणांची शिल्पे असणार आहेत.
कोल्हापूर पॅलेसची रचना जशी केली आहे. अगदी त्यांप्रमाणे स्थापत्य शैलीत बेसाल्ट दगडाच्या भिंतीने एंट्री गार्डन बंदिस्त राहणार आहे. स्वागतार्ह प्लाझा ज्यामध्ये कॅन्टीन, देखभाल क्षेत्र आणि इतर कार्ये असतील. मुख्य प्रवेशद्वार तोफेसह तटबंदी, तिकीट बूथ असेल. पहिल्या टप्प्यात वाहनतळ विकसित केले जाणार आहे. त्यात तीन कार आणि 65 दुचाकी बसतील, एवढी जागा उपलब्ध राहणार आहे. तसेच, बागेला विविध थीममध्ये विभाजित करणाऱ्या भिंती बांधल्या जाणार आहेत. दुस-या टप्प्यात पुतळ्याभोवतीचा पुढचा भाग विकसित करणे, शिल्पे उभारणे आणि भित्तीचित्र बसवणे, ही कामे केली जाणार आहेत.