पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा शिलवंत- धर यांचे नगरसेवक पद रद्द

विभागीय आयुक्तांची महापालिका आयुक्तांना शिफारस

पिंपरी | महाईन्यूज

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांचे प्राण जात असताना नागरिकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून दिलेले नगरसेवक मात्र, भ्रष्टाचारात गुंतले होते. कोरोना काळात महापालिकेच्या भांडार विभागाला थेट पद्धतीने मास्कचा पुरवठा करणार्‍या मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. या कंपनीशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्याने प्रभाग क्रमांक 20 (संत तुकारामनगर)मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांचे पद रद्द करण्याची शिफारस विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (दि. 24) पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी नागरिकांना दहा लाख मास्कची थेट खरेदी करण्यात आली होती. यापैकी मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. या कंपनीने 1 लाख मास्कचा प्रतिनग दहा रुपये या प्रमाणे पुरवठा केला होता. त्यापोटी दहा लाख रुपये महापालिकेने या कंपनीला अदा केले होते. मात्र, लोकप्रतिनिधी अथवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना महापालिकेच्या कोणत्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही. परंतू, एडिसन लाईफ सायन्सेस या कंपनीमध्ये सुलक्षणा शिलवंत यांचे पती राजू धर व त्यांचे बंधू राजरत्न शिलवंत हे संचालक होते.

याबाबत माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात न्यायालयाने विभागीय आयुक्तांना सहा आठवड्यात निर्णय घेण्यासंदर्भात आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज (बुधवारी) अंतिम निकाल जाहीर केला आहे.

सौरभ राव यांनी आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कंपनीस दिर्घ मुदतीचे कर्ज हे सुलक्षणा शिलवंत यांनी दिलेले दिसून येत आहे. सदर कर्ज अस्तित्त्वात नसलेबाबत कोणताही पुरावा त्यांच्याकडून सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांचा कंपनीशी संबंध असल्याचे निदर्शनास येते. तसेच कंपनीशी संबंध असल्यामुळे मास्क खरेदी प्रक्रियेतीलही त्यांचा संबंध निदर्शनास येत आहे.

त्यामुळे, महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येत असल्याने महापालिका अधिनियम 1949 कलम 10 (फ), पोटकल (2) व कलम 11 (ड) मधील तरतुदीनुसार महापालिका नगरसदस्य या नात्याने त्या नगरसेविका म्हणून पदावर राहण्यास अनर्ह आहेत, अशी माझी धारणा आहे. त्यामुळे उपरोक्त तरतुदीनुसार त्यांना अनर्ह करावे, असा माझा निष्कर्ष आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या या आदेशामुळे शिलवंत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात येणार आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Share to