भ्रष्टाचाराच्या पैशातून घेतलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन’ला माझा विरोध !

  • भोसरीतील नागरिकाचा धक्कादायक आरोप

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. भोसरीतील गावजत्रा मैदानावर उद्या रविवारी (दि. 28) सकाळी सहा वाजता या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. मात्र, या स्पर्धेवर भोसरीकरांनी आक्षेप घेतला असून आयोजकांवर फेसबुक पोस्टद्वारे धक्कादायक आरोप केला आहे.

पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी ही सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात येत आहे. ही भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असल्याचाही बोलबाला केला जात आहे. सुमारे दहा हजार नागरिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यातून समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. आमदार महेश लांडगे यांचा यामागील उद्देश एकदम स्वच्छ आहे. परंतु, यावर भोसरीतीलच नागरिकांनी आक्षेप घेतला असून धक्कादायक आरोप केला आहे. “भ्रष्टाचाराच्या पैशातून आयोजित केलेल्या रिव्हर सायक्लोथॉनला माझा विरोध” असल्याची धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

स्पर्धा आयोजित करण्यासाठी खर्च होणारा पैसा खरोखर भ्रष्टाचाराचा आहे की अन्य कोणत्या मार्गाने उपलब्ध केलेला आहे, हा संशोधनाचा भाग आहे. परंतु, असा आक्षेप घेतल्यामुळे आमदार लांडगे यांच्या कामकाजावर भोसरीतूनच नाराजी व्यक्त होऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे भोसरी विधानसभा मतदार संघात भरगच्च इव्हेंट घेतले जात असतानाच दुसरीकडे भोसरीतीलच नागरिक त्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. नागरिक विक्रांत लांडगे यांनी आपल्या फेसबुकद्वारे ही धक्कादायक पोस्ट व्हायरल केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये या पोस्टची चर्चा जोरात सुरू आहे.

आमदार लांडगे यांच्याकडून काय आदर्श घ्यावा ?

आमदार लांडगे यांच्यावर प्रेम करणा-या त्यांच्या चाहत्यांनी भोसरी विधानसभाच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये फ्लेक्स, होर्डिंग्ज, फलक लावून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र, त्यातील असंख्य फ्लेक्स बेकायदेशीरपणे लावण्यात आले आहेत. नियम पायदळी तुडवून फलक लावण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठबळ कुठून मिळाले. बेकायदेशीर काम करणा-या अतिउत्साही कार्यकर्त्यांना वेळीच अडवण्यात का आले नाही ? भोसरीच नव्हे तर संपूर्ण शहर आमचेच असून आम्ही करेल ती पूर्वदिशा असा समज कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालाच कसा ? याचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा. बेकायदेशीर फलकांवर आयुक्तांनी कारवाई केल्यानंतर नामुष्की ओढवून घ्यावी लागली. भोसरीतील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या अशा वागण्यामुळे आमदार लांडगे यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा, असे नागरिक विचारू लागले आहेत.

Share to