आमदार महेश लांडगे यांना आयुक्तांचा दणका, वाढदिवसाचे फ्लेक्स हटविण्याचे आदेश

  • महापालिकेच्या नियमाला फासला हरताळ
  • आयुक्तांचा आदेश येताच मोशीत कारवाईचा धडाका

पिंपरी | महाईन्यूज

नेत्याची मर्जी राखण्यासाठी नियम पायदळी तुडवणा-या कार्यकर्त्यांची संख्या पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी शहरात गल्लीबोळात, चौकात, रस्त्याच्या दर्षनी भागावर अनधिकृत फ्लेक्स लावले आहेत. हे फ्लेक्स तातडीने हटवण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय अधिका-यांना दिले आहेत. आमदार लांडगे यांचा उद्या वाढदिवस असताना आयुक्तांनी हा निर्णय घेतल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. आणि आमदार महेश लांडगे हे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. उद्या शनिवारी (दि. 26) त्यांचा वाढदिवस आहे. कोरोना सावटामुळे मागच्या वर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही. त्यामुळे उद्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आमदार लांडगे यांच्यावर प्रेम असणा-या कार्यकर्त्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघाच्या कानाकोप-यात अधिकृत, अनधिकृत आणि अवैध फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या आहेत. नेत्याचं प्रेम वाढवण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी महापालिकेच्या नियमांना पायदळी तुडवले आहे. मोशी, चिखली, च-होली, डुडुळगाव, दिघी, भोसरी, पिंपरी, संत तुकारामनगर, निगडी या भागासह भोसरी मतदार संघाच्या बाहेर देखील आमदार लांडगे यांचे फ्लेक्स झळकत आहेत. नियमाचे उल्लंघन करून अनधिकृत फ्लेक्स लावल्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी हे बेकायदेशीर फ्लेक्स तत्काळ हटविण्याचे आदेश क्षेत्रीय अधिका-यांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या अडीच महिन्यावर आली आहे. त्यानिमित्त भाजपाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आमदार लांडगे यांच्या कंपुतील चातुर्य पनाला लावणा-या व्यक्तींनी मतदार संघात भाजपाचे ब्रँडींग करण्याकरिता इव्हेंट घेण्यावर भर दिला आहे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सायक्लोथॉन, चला हवा येऊ द्या सारखे असंख्य इव्हेंट घेण्याचे नगरसेवकांना टार्गेट दिले आहे. दिलेले टार्गेट उत्तमपणे पार पाडावे, यासाठी संबंधितांनी त्या-त्या भागात फ्लेक्सबाजी केली आहे.

त्यामध्ये बेकायेदशीरपणे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ते फ्लेक्स पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्यास बाधा पोचवित आहेत. यामुळे पालिका नियमांचे उल्लंघन होत असल्याने आयुक्त पाटील यांनी ते काढण्याचा निर्णय घेतला आहे. मोशी भागातील असंख्य फ्लेक्स हटविण्यात आले आहेत. महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता असताना आयुक्तांनी हा आदेश काढल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.   

आमदाराच्या फ्लेक्सवर झळकला पालिकेचा अधिकारी

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचा फ्लेक्स संत तुकारामनगर आणि महेश नगर याठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यावर चक्क पालिकेच्या अधिका-याचा फोटो दिसत आहे. ठेकेदारांकडून स्वतःच्या खात्यावर पैशाच्या स्वरुपात लाच घेतल्यामुळे या अधिका-याची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी आयुक्त राजेश पाटील यांनी सक्त ताकीद देऊन पुन्हा असे करणार नाही, अशी माफी मागितल्यानंतर त्यांची चौकशीतून सुटका केली होती. तसेच, हाच अधिकारी आमदार महेश लांडगे यांच्या मुलीच्या मांडव डहाळ कार्यक्रमात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा देखील आयुक्तांनी त्यांना तंबी दिली होती. येवढे होऊनही हा अधिकारी आमदार लांडगे यांच्या फ्लेक्सवर झळकताना दिसत आहे. आता या अधिका-यावर आयुक्त निलंबनाची कारवाई करतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share to