उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठय़ाचे नियोजन करा – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – उन्हाळा जवळ येत असून पाण्याचे नियोजन करण्यासाठी खासगी बोअरवेलचे सर्वेक्षण करा, आवश्यकतेनुसार बोअर व विहिरी अधिग्रहण करण्यासाठी माहिती संकलित करा, पाणी कपात धोरण निश्चित करण्यात यावे, रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे, पाणी गळती टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत दिल्या.
पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठक आज पार पडली. सद्यस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराला दैनंदिन पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या पवना धरणातील पाणी साठा ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच आहे. 2023-24 मधील येणारा पावसाळा एल निनो परिणामामुळे प्रभावित होऊन सरासरीपेक्षा बराच कमी होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत शहराला होणारा एकूण पाणीपुरवठा 575 द.ल.लि. प्रतिदिन इतका आहे. एकूण लोकसंख्या अंदाजे 30 लाख इतकी असून सध्या एकदिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. अपेक्षित पाऊस कमी झाल्यास ऑक्टोबर अखेर पवना धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने जून 2024 अखेरपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. पाणी पुरवठ्याबाबत आराखडा तयार करण्यात याव्यात, असे आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत सांगितले.
आंद्रा धरणातून निघोजे येथे 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपसा करून चिखली येथील नवीन केंद्रामधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सुमारे 100 दशलक्ष लिटर पाणीतूट भरून काढण्यात येणार आहे. यासह भामा आसखेड धरणातून 165 दशलक्ष लिटर पाणीउपसा करीता प्रकल्प गतिमान करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अजय सुर्यवंशी, डी. डी. पाटील यांच्यासह उप अभियंता, कनिष्ट अभियंता उपस्थित होते.