विधवा, घटस्फोटित महिलांना अर्थसहाय्यासाठी वयाची अट शिथील
मनसेच्या सीमा बेलापूरकर यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास योजना विभागामार्फत विधवा अथवा घटस्फोटित महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा अथवा घटस्फोटित महिलांना वयाची मर्यादा घालण्यात आली होती. ही वयाची मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी मनसेच्या शहर सचिव सीमा बेलापूरकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन विधवा महिलांसाठी वयाची अट शिथील करण्यात आली आहे.
शहरातील विधवा अथवा घटस्फोटीत महिलांना महापालिकेच्या वतीने 10 हजार रुपये अर्थसहाय दिले जाते. कोविड काळातील विधवा महिलांना 25 हजार रुपयांचे अर्थसहाय देण्यात येते. या योजनांच्या अटी व शर्तीमध्ये काही बदल करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 50 वर्षांच्या आतच महिलेचे वय असावे, अशी अट महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने घालण्यात आली होती. मात्र, या अटीमुळे 50 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांवर एक प्रकारचा अन्याय होत होता. महिलांना अर्थसहाय्यापासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे ही अट रद्द करावी, अशी मागणी बेलापूरकर यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आयुक्त सिंह यांनी वयाची अट रद्द केली आहे.