‘आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं महाविकास आघाडीची मोठी हाणी’, अजित पवारांनी वाहिली श्रध्दांजली
पुणे (प्रतिनिधी) – कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार चालू होते. ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चंद्रकांत जाधव यांना दोनवेळा कोरोनाची लागण झाली. त्यातून ते ठणठणीत बरे झाले. त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला. शांत आणि मितभाषी आणि यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रध्दांजली
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. मी आणि आम्ही सर्वजण जाधव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. दिवंगत चंद्रकांत जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..’