राष्ट्रीय पेयजल योजनेतून मिटली ऐतवडे बुद्रुकची तहान
– कडाक्याच्या उन्हाळ्यातही नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा
सांगली : प्रदीप लोखंडे
भूजलाची घटती पातळी, पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी यासारख्या कारणांमुळे ग्रामीण पाणी पुरवठ्यावर प्रचंड ताण येत आहे. दरवर्षी ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीचे मोठे संकट निर्माण होत असते. मात्र राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत वारणा नदीतून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ऐतवडे बुद्रुकच्या नागरिकांची तहान यंदा मिटली आहे. पाईप लाईनद्वारे नागरिकांना ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीतून सप्टेंबर महिन्यापासूनच पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गावातील १ हजार पेक्षा अधिक नळ कनेक्नशच्या माध्यमातून ९० टक्के नागरिकांना किमान दिवसाआड पाणी पुरवठा होत असून पाणी कपातीचे संकट टळले आहे.

केंद्र शासनामार्फत सन 2009-10 मध्ये वर्धीत वेग ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे करण्यात आले आहे. ग्रामीण भागात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन सुरू झाले. राज्यात २०१७ – १८ दरम्यान भाजपा – शिवसेना युतीचे सरकार असताना या योजनेला गती देण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांना पाईप लाईन मधून शुद्ध पाणी थेट नळाद्वारे देणे असा योजनेचा उद्देश आहे. २०२१ पर्यंत ही योजना राज्यातील प्रत्येक गावात पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ठ होते. ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्ती मागे 41 ते 54 लिटर पाणी तर शहरी भागाजवळ असणाऱ्या गावाला प्रत्येक व्यक्ती मागे 71 लिटर पाणी देण्याची योजना आहे. त्या योजनेअंतर्गत ऐतवडे बुद्रुक मध्ये पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली.
ऐतवडे बुद्रुकच्या तत्कालीन सरपंच प्रतिभा बुद्रुक यांच्या काळात असणाऱ्या ग्रामपंचायत मार्फत या योजनेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. वारणा सहकारी बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक यांनी तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठपुरावा करत सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यामधून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीतून पाईप लाईनद्वारे ऐतवडे बुद्रुक येथील कावखडी येथे असणाऱ्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी आणण्यात आले. एकूण साडे सात किलोमिटरची ही पाईपलाईन करण्यात आली. दरम्यानच्या काळात काही तांत्रिक चुकांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर सद्याच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत तज्ञ आणून नेमकी समस्या जाणून घेतली. पाणी सोडताना व्हॉल्व खुले न केल्याने पाईप लाईन मध्ये हवेचा दाब तयार व्हायचा. परिणामी पाणी गळती होत असते. त्यामध्ये सुधारणा केल्यानंतर पाणी गळती देखील थांबली असून पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला असल्याची माहिती उपसरपंच संदीप गायकवाड यांनी दिली.
पूर्वी वशी येथील विहिरीतून पाण्याचा पुरवठा होत असे. सद्या पावसाचे प्रमाण घटल्याने विहिरीतील पाणी साठ्यात घट होत होती. परिणामी नागरिकांना पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत असे. मात्र यंदा अतिरिक्त पाण्याची सोय झाल्याने नागरिकांचे पाण्याचे संकट टळले आहे.
पाच महिने आधीच पाण्याचा पुरवठा –
ऐन उन्हाळ्यात विहिरीतील पाणी पातळी घटल्यानंतर दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून गावाला पेयजल योजनेतून अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. यंदा उन्हाचा कडाका वाढला आहे. पाणी पातळीत पूर्वीपेक्षा मोठी घट झाली आहे. त्यामुळे या वर्षी पाच महिने आधीच म्हणजे स्पटेंबर महिन्यापासूनच पाणी पुरवठा करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे यांनी दिली. मात्र नव्या योजनेमुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याचा पुरेसा पुरवठा होत असल्याने पाणी कपातीची झळ बसली नसल्याचे चित्र आहे.
—————————————
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967