हातकणंगले मध्ये धनुष्यबाणावर कमळ नाराज
– पाच वर्षात खासदार धैर्यशील माने यांचा संपर्क नसल्याची चर्चा
सांगली ! प्रदीप लोखंडे
निवडून आल्यापासून गेल्या पाच वर्षात संपर्क न ठेवल्याने खासदार धैर्यशील माने यांच्याबाबत महायुतीमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यांच्या ऐवजी इतर उमेदवार देण्याची मागणी होत असल्याची चर्चा आहे. या मध्ये भाजपाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आग्रही आहेत. त्यामुळे माने यांच्या ऐवजी इतर नावे पुढे येत आहेत. या बाबत वरिष्ठ पातळीवरून देखील स्पष्टता आणली जात नाही. परिणामी खासदार माने यांची प्रचारात ‘निगेटिव्ह इमेज ब्रॅण्डिंग’ होत असल्याचे चित्र आहे. त्याचा फायदा माजी खासदार राजू शेट्टी यांना होईल का, हे पाहावे लागणार आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र मध्यंतरी राजकीय कोलांटउड्या मारल्याने त्यांना निवडणुकीत फटका बसला. धैर्यशील माने शिवसेनेतून खासदार झाले. दरम्यानच्या काळात शिवसेना फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या सोबत पक्ष प्रवेश केला. पाच वर्षाच्या काळात त्यांनी हातकणंगले लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघात संपर्क ठेवणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नसल्याची तक्रार महायुतीमधील मित्र पक्ष करत आहेत. जनतेमध्ये देखील त्यांच्या बाबत नाराजीचा सूर असल्याने त्यांना उमेदवारी न देण्याची मागणी पुढे आली होती. तरी देखील धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी अंतर्गत नाराज असल्याची चर्चा आहे.
उमेदवारीबाबत सुरुवातीपासूनच निगेटिव्ह चर्चा होत असल्याने खासदार माने प्रचारात देखील निगेटिव्ह झाले असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांनी अंतर्गत सर्वे केला असून त्यामध्ये माने यांचे निवडून येणे कठीण असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगवली जात आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या ऐवजी इतर उमेदवारांचा शोध सुरू असल्याचे देखील सांगितले जात आहे. या मध्ये माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने, भाजपमधून शौमिका महाडिक, राहुल महाडिक यांच्या नावाची सद्या तरी चर्चा होत आहे. या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपाचे वरिष्ठ नेते हे स्पष्टपणे सांगत नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. खासदार धैर्यशील माने यांचा प्रचार करायचा आहे किंवा नाही ? उमेदवार बदलणार आहेत का ? मतदारसंघ कोणाला सोडला जाईल, या संभ्रमात पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. मात्र राजकारणात किमान निवडणुकीत उमेदवारीबाबत स्पष्टता नसेल तर त्याचा निवडणुकीत देखील तोटा होण्याची शक्यता असते. आपली राजकीय इमेज सांभाळण्यात सद्या तरी खासदार धैर्यशील माने यांना अपयश आले असल्याचे दिसत आहे.
राजू शेट्टी फायदा घेणार का ? –
माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा दंड थोपटून मैदानात असल्याचे सांगितले आहे. या वेळी त्यांच्या कडून जपून राजकीय पाऊले टाकली जात आहेत. गेल्या निवडणुकीचा अनुभव पाहता ते स्वतःच्या स्वाभिमानीचा झेंडा घेऊन लढणार आहेत. मात्र हे करताना धैर्यशील माने यांच्याबाबत असणाऱ्या नाराजीचा फायदा घेण्यात ते कमी पडताना दिसत आहेत. महविकास आघाडी तसेच महायुतीमधील नाराजांची सांगड घालून ते विजय होतील का हे निवडणूक निकालानंतर पाहावे लागणार आहे.
———————————–
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967