मारुंजी ग्रामपंचायतीच्या लाचखोर प्रशासनाचा कारभार एसीबीच्या रडारवर ?..

  • खंडणीसाठी प्रशासनाच्या अडून पदाधिकाऱ्यांचा उद्योजकांना त्रास..
  • उद्योगं-धंदे इतरत्र स्थलांतरीत होण्याच्या तयारीत…

हिंजवडी, (प्रतिनिधी) :- पाणी कनेक्शन आणि ड्रेनेजलाईनसाठी उद्योजकांसह सर्वसामान्यांना वेठीस धरून त्यांच्याकडून चक्क लाखो रुपयांची थेट मागणी मारुंजी ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्यांकडून केली जात आहे. विशेषकरून गावगाडा चालवणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंच यांची यात मिलीभगत असल्याचा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांसह नागरिक मेटाकुटिला आले आहेत. दलाल आणि स्थानिक गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांची साखळी तयार झाली आहे. यामुळे मारुंजी ग्रामपंचायतीचा लाचखोर पदाधिकाऱ्यांचा कारभार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रडारवर आला आहे.

आयटी पार्कलगत वसलेल्या मारुंजी गावचा खेडं ते महानगर असा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासात गृहप्रकल्प उभारून गावाच्या विकासात मोठ योगदान देणाऱ्या विकसकांच स्थान वरचं म्हणावं लागेल. गावच्या वैभवात त्यांनी मोठी भर पाडलेली आहे. मात्र, गावकुसाचा कारभार या विकासाला अडचणीत आणू पाहत आहे. गुंठा-दोन गुंठे जमीन घेऊन घरं बांधणारा चाकरमानी वर्गदेखील यांच्या कोंडीत सापडलेला आहे.

ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्याकडून ड्रेनेज आणि पाणी कनेक्शनसाठी तब्बल १५ ते २० लाखांची मागणी केली जात आहे. नाईलाजाने त्यांना पैसेही दिले जातात. गावकारभारी बदलला की दुसरा येतो. जेसीबी लावून कनेक्शन तोडण्याची भाषा वापरली जाते. दर तीन महिन्यांनी सरपंच बदलतात. महिला सरपंचाचे पतीही यात मागे नाहीत. या महिला सरपंचांच्या पतींना कनेक्शन तोडण्याचे अधिकार दिलेत कोणी ? तडजोड होत नाही, पैसे द्यावेच लागतात, असं अनेकजण खाजगीत सांगतात. प्रकल्प, घरं बांधताना लोकं ड्रेनेजलाईनमुळे पर्यायी व्यवस्था उभारत नाहीत. तसेच पैसे देऊन देखील पुरेशा दाबाने पाणी पुरवठा केला जात नाही, अशी अनेकांची ओरड आहे. फसवणूक झालेले नागरिक तक्रार करण्यास धजावत नसल्यामुळे यांचं कलेक्शन जोरात सुरु आहे.

मारूंजी गावचा विकास खुंटन्याची भीती ?

एकीकडे वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरविण्यात येथील ग्रामपंचायतीवर मोठा ताण येत असल्याच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे स्वतःच बकालपणा वाढवायचा, असा गोरखधंदा येथील स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे. विकासाला चालना देण्यासाठी त्यांना पूरक आणि पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे. विकसक आणि व्यवसायिक यांच्या आर्थिक लुटीमुळे उद्योग-धंदे दुसरीकडे स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे मारुंजी गावच्या वैभवाला काळिमा फासला जात आहे. गावचा आणि परिसराचा विकास खुंटन्याची भीती व्यक्त केली जात आहे. ”कधीकाळी मदतीसाठी सदैव तत्पर असणारी मारुंजी ग्रामपंचायत सत्तांतराच्या हव्यासापोटी सत्ता आणि पैसा हेच समीकरण डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे?, असा संशय निर्माण होत आहे. व्यवसायिक आणि सर्वसामान्यांकडून मुलभूत सोयी-सुविधांसाठी लाखो रुपये उकळण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना जमिनी घेऊन इथे उद्योगं किंवा घरं उभारण परवडणारं नाही. केंद्र सरकार ‘मेक इन’च्या नावाने उद्योगांना चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवते. मात्र, स्थानिक पातळीवर मदत होत नसल्यामुळे उद्योगांचे हाल होत आहेत. यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी देखील पुढे येऊन तक्रार केली पाहिजे. अन्यथा ही साखळी अशीच सुरु राहून मारुंजी गावच्या विकासात अडथळा आणत राहील. अशाने गावात आणखीनच बकालपणा वाढेल. दलाल आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची साखळी तयार झाल्यामुळे मारुंजी ग्रामपंचायत प्रशासन एसीबीच्या रडारवर आले आहे, हे नक्की”, अशी कुजबुज स्थानिक नागरिकांमध्ये खाजगीत सुरु आहे.

मुद्दामहून कोणालाही त्रास दिला जात नाही. सध्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नळ कनेक्शन देण्यात अडचणी उद्भवत आहेत. ड्रेनेजलाईनसाठी देखील अर्ज आले असता त्यांना तातडीने लाईन जोडून दिली जात आहेत. कोणाचीही आर्थिक लुट केली जात नाही.
– मा. तुळशीराम रायकर, ग्रामविकास अधिकारी, मारुंजी…

याबाबत गावच्या विद्यमान सरपंच जयश्री कवडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Share to