कधी सुटणार मोशी-गायकवाड वस्तीतील ‘साहिल ओम पार्क’ सोसायटीसमोरील अर्धवट रस्त्याचा प्रश्‍न ?

  • सोसायटीतील नागरिकांना जीव मुठीत धरून दररोज करावा लागतोय महामार्गावरून प्रवास..
  • पिंपरी चिंचवड महापालिका केवळ बघ्याच्या भूमिकेत…

पिंपरी (दि. २०) :- मोशी-गायकवाड वस्ती येथील साहिल ओम पार्क सोसायटीसमोर पिंपरी चिंचवड महापालिकेने डांबरी रस्ता तयार केला आहे. तो रस्ता पुढे मोशी-चिखली मार्गाला जोडला जाणार आहे. मात्र, भूसंपादन नसल्यामुळे रस्ता अर्धवट अवस्थेतच पडून आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी टोलनाका येथून मोशी, चिखली, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी परिसराकडे जाण्यासाठी जीव मुठीत धरून मोठा यु टर्न घेऊन ये-जा करावी लागते. नागरिकांना दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.

मोशीतील टोल नाक्यावर जुन्नर, खेड, आंबेगाव आदी ग्रामीण भागातून शहराकडे, तर पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडून चाकण औद्योगिक परिसराकडे जाणार्‍या वाहनचालकांची वर्दळ असते. शिवाय चाकण एमआयडीसी औद्योगिक परिसरातील मालाची वाहतूक करणारी जड-अवजड वाहने या मार्गावरूनच ये जा करीत असतात. टोल नाक्यामुळेही मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. त्यामुळे रांगेमध्ये बराच वेळ थांबावे लागत असल्याने वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा फटका बसत आहे. मोशी टोल नाका, शिवाजीवाडी चौक ते भारत माता चौक या एक किलोमीटरच्या अंतरामध्ये वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गायकवाड वस्ती येथील साहिल ओम पार्क सोसायटीसमोरील अर्धवट रस्ता तत्काळ पूर्ण करावा. जेणेकरून येथील नागरिकांना मोशी, चिखलीत जाण्यासाठी पुणे-नाशिक महामार्ग वगळता सरळमार्गे प्रवास करता येईल, अशी मागणी मोशी गायकवाड वस्ती येथील स्थानिकांकडून होत आहे.

Share to