दुसरी लसमात्रा टाळणा-यावर निर्बंध लादले जाणार, अजित पवार यांचा इशारा
मुंबई – करोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा न घेतलेल्यांची संख्या राज्यात जवळपास पावणेदोन कोटी आहे. त्यामुळे दुसरी लसमात्रा टाळणाऱ्यांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले.
राज्यात पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. पण, दुसरी मात्रा घेण्यात बरेच जिल्हे मागे आहेत. दुसऱ्या लसमात्रेची मुदत उलटूनही जवळपास दीड ते पावणेदोन कोटी नागरिकांनी लशीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुसरी लसमात्रा घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याचे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितले.
देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लससाठा आहे. लस उपलब्ध असतानाही नागरिक दुसरी मात्रा घेत नाहीत, याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओमायक्रॉनबाबत करोनाविषयक कृती दलाशी चर्चा केली आहे. ओमायक्रॉनबाबत वेगवेगळ्या प्रकारची मते ऐकायला मिळत आहेत. ओमायक्रॉनची लागण झालेला डोंबिवलीतील रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णामुळे इतर कोणीही बाधित झालेला नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.