बारामती मतदार संघावर भाजपाचा डोळा, प्रदेशाध्यक्ष तीन दिवसांच्या दौ-यावर

पुणे – बारामती लोकसभा निवडणूक संघाची आगामी रणनीती ठरण्याच्या दृष्टिकोनातून भाजपाने पावले उचलली आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत्या 6 सप्टेंबर रोजी बारामतीच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

बावनकुळे हे 5 सप्टेंबर रोजी बारामती मुक्‍कामास येणार आहेत. ते 6 सप्टेंबर रोजी सकाळी सातपासून संध्याकाळी सातपर्यंत तब्बल 12 तास बारामती शहर व बारामती तालुक्‍यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये भाजपच्या काही शाखांची उद्‌घाटने होणार असून काही मान्यवरांच्या गाठीभेटी ते घेतील. या व्यतिरिक्त पत्रकार परिषदेस ते संबोधित करणार आहेत.

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले आहे. त्याबाबतची रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. आगामी काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा होणार असून त्या दृष्टीने दौऱ्याची आखणी करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत.

बारामती शहर व बारामती तालुक्‍यातील काही प्रमुख मान्यवरांशी ते चर्चा करणार आहेत. शहरातील भिगवण रोडवरील मुक्ताई गार्डन या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देखील अविनाश मोटे यांनी दिली. तसेच, बारामती तालुक्‍यातील काटेवाडी, माळेगाव, बारामती शहर या ठिकाणी ते भेट देणार आहेत. पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांना टक्‍कर देण्याच्या दृष्टीने भाजपने रणनीती आखण्यास प्रारंभ केला असून बावनकुळे हे त्याच उद्देशाने बारामतीत येत आहेत.

कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे
कार्यकर्त्यांना ताकद देणे, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे व भाजपसाठी बारामतीत पार्श्वभूमी तयार करणे या दृष्टीने आगामी काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, बाळासाहेब गावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती अविनाश मोटे यांनी दिली.

Share to