पिंपरी (प्रतिनिधी) - देहूरोडच्या भुमिला एैतिहासिक वारसा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे हि येथिल सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची तसेच सर्व शिव भक्तांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याबाबत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी, स्थानिक नागरीकांनी मला निवेदन दिले आहे. स्थानिक प्रशासन आणि सर्व पक्षियनेत्यांशी चर्चा करुन याबाबत लवकरच निर्णय घेऊन पाठपुरावा करु असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
देहूरोड मधील सेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपब्लिकन पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी आणि मावळची शिववंदना संस्था तसेच येथील सर्व महिला मंडळ, संस्था, संघटना, ट्रस्ट यांच्या शिष्टमंडळाने देहूरोड मध्ये भव्य शिव स्मारक उभारावे अशा मागणीचे निवेदन खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल आण्णा शेळके, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डचे सीईओ रामश्रृत हरीव्दार, प्रशासक कैलास पानसरे यांना नुकतेच दिले आहे. या शिष्टमंडळाशी संवाद साधताना खा. श्रीरंग बारणे म्हणाले की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक मावळच्या भुमित होणे हि मावळ वासियांसाठी अभिमानाची बाब आहे.
देशात सर्वात जास्त वाहतूक असणारा देशाच्या दळणवळण यंत्रणेत महत्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 हा देहूरोड मधून जातो. रयतेचे राज्य उभारताना मावळच्या हजारो मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि प्रेरणादायी इतिहास भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असे शिवस्मारक या ठिकाणी उभारण्यासाठी मी स्वता: खासदार आणि शिवभक्त म्हणून पुढाकार घेईल असे देहूरोड मधील नागरीकांच्या एकजूटीने शिवस्मारकाची हि मागणी लवकरच पुर्णत्वास जाईल असा मला विश्वास आहे असेही खा. श्रीरंग बारणे यावेळी म्हणाले.
Views: 68