वाकडमधील अनधिकृत फ्लेक्स, किऑक्स, इंटरनेट केबल स्वःखर्चातून काढणार – स्थायीच्या माजी सभापती ममता गायकवाड
- आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 वाकड, पिंपळे निलख येथे अनधिकृत फ्लेक्स, किऑक्स, केबल्स टाकण्यात आल्यामुळे या भागात बजबजपुरी माजली आहे. प्रभाग सुंदर ठेवण्यासाठी ही अनधिकृत फ्लेक्स, किऑक्स व केबल्स स्वखर्चातून काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी सभापती तथा प्रभागाच्या नगरसेविका ममता विनायक गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. त्यात माजी सभापती गायकवाड यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 26 वाकड, पिंपळे निलख येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स, किऑक्स लावण्यात येतात. विद्युत पोलवरून अनधिकृतपणे इंटरनेट केबल टाकण्यात येतात. यामुळे प्रभागाचे विद्रुपीकरण होत आहे. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रासही सहन करावा लागत आहे. हे बेकायदेशीर फ्लेक्स, किऑक्स, इंटरनेट केबल काढण्याबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केल्यानंतर कारवाई केली जाते. त्यानंतर लगेचच त्याठिकाणी फ्लेक्स, किऑक्स झळकतात. ते काढण्यासाठी पुन्हा तक्रार केल्यानंतर कारवाईला सहा महिन्यांचा अवधी लागतो.
नागरिकांच्या हिताकरिता पिंक सिटी रस्ता, काळेवाडी फाटा ते मानकर चौक, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता, दत्त मंदिर रस्ता याठिकाणी लावलेले अनधिकृत फ्लेक्स, किऑक्स व पोलवरील अनधिकृत इंटरनेटचे जाळे स्वःखर्चातून काढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी माजी सभापती तथा नगरसेविका गायकवाड यांनी आयुक्तांकडे या निवेदनाद्वारे केली आहे.