‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील शाळा आजपासून बंद, आयुक्तांचा आदेश
पिंपरी (प्रतिनिधी) – कोविड 19 च्या नवीन ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करत पिंपरी-चिंचवड महापालिकेने इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जगभरात कोरोना विषाणुचा नवा प्रकार ओमायक्रॉन आढळून आला आहे. या विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात कोविड 19 संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 अंमलात आणलेला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार खालील व्यवसाय, आस्थापना व व्यवस्थापनांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत.
हे नियम पिंपरी-चिंचवडमध्ये लागू करण्यात आले आहे.
- खुल्या प्रांगणातील/लॉनवरील किंवा बंदिस्त कार्यालयातील विवाह सोहळे जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यास परवानगी राहील.
- कोणताही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमांचे बंद जागेत किंवा मोकळ्या जागेमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत आयोजन करण्यास परवानगी राहील.
- अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
- सर्व शाळा, महाविद्यालये, दुकाने, खासगी व सरकारी कार्यालये, बँका, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार, मॉल मालक व इतर आस्थापनां किंवा व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सर्व व्यवस्थापक, अधिकारी तसेच कर्मचा-यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा करावी. या कर्मचा-यांची यादी माहिती/(प्रमाणपत्र) तयार ठेवावी. सक्षम प्राधिका-यानी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना ती उपलब्ध करून द्यावी. तसेच, सर्व सामान्यपणे काही अपवादात्मक परिस्थिती व अतितातडीची बाब वगळता त्यांच्या कार्यालयात किंवा आस्थापनेत येणा-या सर्व नागरिकांनाही लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण केल्याची खात्री करूनच प्रवेश देण्यात यावा. (नो मास्क- नो एंट्री, नो व्हॅक्सीन- नो एंट्री)
- पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी मा. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांनी कोविड 19 च्या आजारास प्रतिबंध करण्यासाठी दि. 30/12/2021 रोजी निर्गमित केलेले आदेश यासोबत संलग्न करण्यात आला आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
- संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे नियमित वर्ग 30 जानेवारी 2022 पर्यंत बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.
या प्रतिबंधात्मक आदेशाचे व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील, असे आयुक्त पाटील यांनी निर्देशित केले आहे.