भ्रष्टाचारामुळे पिंपरी-चिंचवड मनपाचे नाव विधानसभेत गाजले, मुख्यमंत्र्यांनी डागली फडणवीसांवर तोफ

पिंपरी (प्रतिनिधी) – मुंबई पालिकेत भ्रष्टाचार झाला असे भाजप म्हणतेय मग भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये काय ? असा सवाल करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रतिप्रश्न केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याची टीका केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांचे सर्व आरोप खोडून काढले. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना विरोधक जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली.

सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणले जात आहे. माझ्या कुटूंबियांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमचा रोष माझ्यावर आहे तर मी तुमच्या बरोबर येतो मला तुरुंगात टाका. काल फडणवीस यांनी मुंबई पालिकेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केला. मात्र, मुंबई पालिकेने गेल्या अनेक वर्षात खूप चांगले निर्णय घेतले आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

कोविड काळात पालिकेने सर्वोत्तम काम केले, असे असताना मुंबई पालिकेच्या कारभारावर विरोधक भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मग भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे काय ? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाव राज्यात गाजत असल्याचा प्रत्यय आला.

Share to