नगररचना विभागात लाचखोरीचा सुळसुळाट, काही अधिकारी ‘एसीबी’च्या रडावर ?

  • पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी भागातील बांधकाम व्यावसायिकांच्या तक्रारी
  • आयुक्त राजेश पाटील यांचे लाचखोर अधिका-यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष

पिंपरी (प्रतिनिधी) – लाचखोरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एकेक प्रकरण समोर येत आहे. लाच घेणा-या कर्मचा-यांवर ‘एसीबी’च्या धाडी पडत असतानाच नगररचना विभागातील काही निर्ढावलेल्या अधिका-यांची वसुली मात्र, जोरात सुरू आहे. आयुक्त राजेश पाटील यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या विभागातील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी भागातील परवाना अभिप्राय देण्याचे काम करणारे जगताप नावाचे उपभियंता यांच्या वसुलीने या भागातील नागरिक अक्षरषः हैरान झाले आहेत. पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नसल्याच्या तक्रारी नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांनी केल्या आहेत. अशा लाचखोर अभियंत्यांमुळे महापालिकेतील नगररचना विभाग ‘एसीबी’च्या रडावर आला आहे.     

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगररचना विभागात बांधकाम व्यवसायिक, मिळकतधारक प्लॅन पास करण्याकरिता अभिरप्राय घेण्यासाठी फाईल सादर करतात. मात्र, या विभागातील अधिका-यांपासून ते कर्मचा-यांपर्यंत लाच वसुलीचे रॅकेट तयार झाले आहे. प्रत्येक स्क्वेअर फुटाला इथे वेगवेगळा भाव फुटलेला आहे. पैसे दिल्याशिवाय अभिप्राय मिळत नाही. अभिप्राय न मिळाल्यास ती फाईल पुढच्या टेबलवर सरकत नाही. पैसे देऊन फाईल पुढे सरकवली तर पुढच्या टेबलवर सुध्दा पैसेच मोजावे लागतात. यामुळे बांधकाम व्यवसायिक असतील किंवा सर्वसामान्य नागरिक यांना लाचखोर अधिका-यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ‘भ्रष्टाचार रोखणे म्हणजे जीभेवर ठेवलेल्या गोड मधाचा थेंब चाखण्यास प्रतिबंध घालण्यासारखे’ आहे, असे आयुक्त सांगतात. यामुळेच आयुक्त या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. लाचखोरीच्या प्रकरणामुळे नगररचना विभाग ‘एसीबी’च्या रडारवर आला आहे.

पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, पिंपळे निलख भागातील कामकाज पाहणारे जगताप नावाच्या उपअभियंत्याचा नागरिकांना त्रास सुरू झाला आहे. किरकोळ कामासाठी नागरिकांना सहा ते सात तास वेटींगवर ठेवले जात आहे. सिटी सर्वे लाईन व हद्दीची लाईन यावरून क्युरीज काढल्या जातात. नागरिकांना हद्दीच्या नोंदी आणण्यास सांगितले जाते. जोपर्यंत नोंदी येत नाहीत, तोपर्यंत अभिप्राय मिळणार नाही, असे स्पष्ट सांगितले जाते. परंतु, एखाद्याने चार पैसे हातावर टेकवले की तात्काळ अभिप्राय दिला जातो. पिंपळे गुरव येथील एक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक कामासाठी त्यांच्याकडे सलग सहा दिवस फेऱ्या मारीत होते. सहा दिवस उलटून गेल्यानंतर ही तुम्ही काम करत नाही, मी तुमच्याविरोधात भाऊंकडे तक्रार करनार असल्याचा इशारा दिला. त्यावर जगताप यांनी भाऊ, दादा, महापौर कोणाकडे जायचे त्याच्याकडे जा, मला फरक पडत नाही, अशा उर्मट प्रकारे अभियंते जगताप यांनी वर्तणूक केली.  

जगताप यांच्या मनमानी कारभारामुळे त्या भागातील नागरिक, बांधकाम व्यवसायिक अक्षरषः वैतागले आहेत. त्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या अधिका-यांना पगार देण्यासाठी नागरिकांच्या खिशातून पैसे काढले जातात. या अधिका-यांना प्रतिमहा एक ते दीड लाख रुपये वेतन दिले जाते. तरी देखील बेकायदेशीरपणे पैसे उकळण्यासाठी सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो. त्यामुळे हा व्यक्ती आणि त्याचे सहकारी आता ‘एसीबी’च्या रडावर आले आहेत.  

त्या लाचखोर अधिका-यावर होणार कारवाई ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 1997 पासून 30 अधिकारी व कर्मचा-यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. नुकतेच महापालिकेच्या कामाचे टेंडर मंजूर झाल्यानंतर वर्क ऑर्डरसाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने दहा लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत अॅड. नितीन लांडगे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे यांना अटक केली होती. त्यावर चार दिवसांपूर्वी थेरगाव कर संकलन कार्यालयातील मुख्य लिपीक हैबती मोरे व लिपिक प्रदीप शांताराम कोठावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता नगररचना विभागातील लाचखोर अधिकारी, कर्मचा-यांवर ‘एसीबी’ करडी नजर ठेवून आहे, अशी माहिती समजते.

Share to