जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मदिनी ऐतिहासिक वास्तू उभारण्याचा योग, मनस्वी आनंद – महापौर माई ढोरे
पिंपरी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व नुतनीकरणाचे लोकार्पण राजमाता जिजाऊ मॉ॑साहेब यांच्या जन्मदिनी करण्यात येत आहेत. तसेच फुगेवाडी ग्रामस्थांच्या मागणीस अनुसरून भव्य अशी ऐतिहासिक वास्तू उभारण्यात आली, याचा सर्वस्वी आनंद होत असल्याचे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्र. ३० फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व नूतनीकरण करण्याच्या कामाचे लोकार्पण महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता खुळे, नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित आप्पा काटे, नगरसदस्या आशा धायगुडे शेंडगे, स्वाती उर्फ माई काटे, माजी नगरसदस्य प्रशांत फुगे, माजी नगरसदस्या संध्या गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात तसेच फुगेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, स्वाती उर्फ माई काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सन १९९८ साली उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणामध्ये संपूर्ण नेवासा दगडात बांधकाम करणेत आलेले आहे. ४१ लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सुशोभीकरणामध्ये धातूमध्ये तयार केलेल्या तलवारी, राजमुद्रा, ढाल, झेंडे व वाघनखे बसविण्यात आली आहेत. तसेच सागवानी दर्जाचे दरवाजे देखील बसविण्यात आलेले आहेत.
एकंदरीत ऐतिहासिक स्वरुपात जिवंत वास्तू दाखविण्यात आलेली आहे. उर्वरित बाजूस स्टीलचे रेलिंगग्रील व गेट बसविण्यात आलेले आहे. तसेच बाजूच्या भिंतीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित म्युरल्स बसविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. माजी स्थायी समिती सभापती प्रशांत फुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.