बालेवाडीतून अपहरण झालेला चार वर्षीय ‘डुग्गु’ अखेर सापडला

पिंपरी | महाईन्यूज

अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा अखेर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सापडला. एका सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे ज्येष्ठ नागरिक यांनी त्याच्या कुटुंबियांना फोन करून ही माहिती दिली.

पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सर्वत्र शोध घेत होते. अखेर आज दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. मात्र, त्याचं कोणी अपहरण केलं ? का केलं ? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावरून अपहरणकर्त्यांना वारंवार आवाहन केलं होतं. ”तुम्ही पाहिजे तेवढे पैसे घ्या पण माझ्या लेकराला सोडा.”, अशी आर्त विनवणी ते करत होते. तसेच, त्याला ताप आला असल्यास कुठलं औषध द्यायचं हे देखील त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. हे सगळं पाहून नेटिझन्स व नागरिकही हळहळत होते.

दरम्यान, पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि  त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता. दरम्यान, तेथील सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले.   

सुरक्षा रक्षक बनले देवदूत

आज बुधवारी दुपारी अपहरण झालेल्या या चिमुरड्याला पूनावळे येथे आरोपी व्यक्तीने सोडून दिलं होतं. पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मुलाला ताब्यात घेउन त्याच्या पालकांकडे सुपुर्द केलंय. मुलगा सुखरूप असून त्याला कोणत्याही प्रकारे जखम झाली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांच्याजवळ स्वर्णवला सोडण्यात आलं होतं. आरोपीने स्वर्णव ऊर्फ डूग्गू याला त्यांच्याकडे सोपवलं आणि तिथून पळ काढला. दादाराव जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून याबाबतची पोलीसांना माहिती दिली आणि त्यानंतर स्वर्णव आपल्या घरी सुखरुप पोहोचला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

Share to