सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार, शिक्षण मंत्र्यांचा निर्णय
मुंबई – राज्य सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार (दि. 24) पासून शाळा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि विद्यार्थांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्याबाबत काळजी घेत शाळा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्या त्या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबतचे निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहे. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुद्धा संमती मिळाली असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.
मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या संदर्भात मागणी होत होती. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक स्तरावर देण्याची मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सोमवारपासून म्हणजेच, 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत.