कोरोनाची वाढती संख्या विचारात घेता शहरातील शाळा सरु करू नयेत – महापौर उषा ढोरे
पिंपरी (प्रतिनिधी) – कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील शाळा तुर्तास सुरू करू नयेत, अशी मागणी महापौर उर्षा ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.
राज्य शासनाने पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्यासंदर्भात निर्णय दिला. शहरातील रुग्णसंख्या, रुग्णवाढीचा दर आणि परिणाम पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आल्याचे राज्य शासनामार्फत सांगण्यात आले आहे.
वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु असून अद्यापही 100% लसीकरण पूर्ण झालेले नाही. तसेच 15 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणास अद्याप सुरवातही झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरु झाल्यास लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची काळजी घेऊन शासनाने दिलेले निर्बंध पाळून जास्तीत जास्त लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही महापौर ढोरे यांनी केले.