कामगारांचा अपेक्षाभंग करणार अर्थसंकल्प – डॉ. कैलास कदम
पिंपरी (प्रतिनिधी) – केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मंगळवारी केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात कामगारांना डावलण्यात आल्याचे दिसते. देशाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यामध्ये आणि जीडीपीमध्ये सर्वात जास्त योगदान कामगारांचे आहे. केंद्र सरकारने कामगारांना काहिही न देता कामगारांच्या पुढील वर्षात वाढणा-या वेतनातून प्राप्तीकर कापून घेऊन स्वता:च्या पदरात निधी मिळवण्याची तरतूद केली आहे. मागील पाच वर्षांपासून प्राप्तीकर मर्यादा अडीच लाख आहे. यामध्ये वाढ करुन प्राप्तीकर मर्यादा किमान पाच लाख रुपये करणे अपेक्षित होते. कामगारांना या अर्थसंकल्पातून काहीही फायदा न होता आर्थिक नुकसान होणार आहे.
सितारामण यांनी सुमारे नव्वद मिनिटे अर्थसंकल्प मांडण्यासाठी वेळ घेतला. यामध्ये त्यांनी संघटीत व असंघटीत कामगार क्षेत्राचा एकदाही उल्लेख केला नाही. तर उलटपक्षी कार्पोरेट क्षेत्रासाठी तीन टक्के सवलत जाहिर केली. संघटीत व असंघटीत क्षेत्रात बारा कोटींहून जास्त कामगार अल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी वाढीव तरतूद करावी अशी मागणी यापुर्वीच इंटकच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी केली होती. कोरोना काळात अनेक क्षेत्रातील कोट्यावधी कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासाठी विशेष अर्थसहाय्य मिळणे अपेक्षित होते. याकडे देखिल अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगारांचा अपेक्षाभंग करणारा आहे अशी प्रतिक्रिया इंटकचे राष्ट्रीय वरिष्ठ सचिव व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी प्रसिध्दीस दिली आहे.