प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त कारणांसाठी करावा – आयुक्त राजेश पाटील

  • भूगर्भातील पाण्याच्या संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांना विविध सुविधा पुरविणेसाठी आणि सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कायमच तत्पर आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून शुद्ध पाण्याची वर्षभर उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. पिण्याचे पाणी या नैसर्गिक स्त्रोताची उपलब्धता कमी होत असल्याने पाण्याचा वापर निश्चितच काटकसरीने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त्‍ कारणांसाठी करावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी केले आहे.

पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त बांधकाम, बागकाम, रस्ते- सफाई, औद्योगिक क्षेत्र, अग्रिशमन आदी कामांसाठीही पाण्याची मागणी वाढत आहे. एकीकडे पाण्याची मागणी वाढत असताना दुसरीकडे मात्र शहरीकरणामुळे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे. महापालिकेमार्फत घरात तसेच सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेले सांडपाणी संकलित करून त्यावर मैलाशुद्धिकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केल्यानंतर नदीत सोडले जाते. पाण्याची वाढती मागणी व सांडपाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सांडपाणी प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचा संकल्प आहे. माझी वसुंधरा अभियान २० तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून निसर्गाच्या पंचतत्त्वांपैकी एक “जल” या तत्त्वाचे संवर्धन करणे शक्य होत आहे. पाण्याचा पुनर्वापर केल्याने तयार होणारे सांडपाणी देखिल कमी होणार असुन त्यामुळे नदी प्रदुषणामध्ये घट होण्यास मदत होईल. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त इतर गरजांकरिता पुनर्वापर केल्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होऊन तितक्याच क्षमतेचे पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच, पाण्याच्या शुद्धिकरणासाठी लागणारा खर्च कमी होणार आहे.

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर RMC plant, बांधकाम, बागकाम, फ्लशिंग, रस्ते साफसफाई, गाड्या धुणे ( Washing centre ), अग्निशमन, औद्योगिकीकरण, शेती इत्यादी कामांकरिता करणे सहज शक्य आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल. घरगुती व खासगी इमारत बांधकाम, उद्याने, औद्योगिक कारखाने आणि अन्य कामासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करुन भूगर्भातील पाण्याचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावावा, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले आहे. 

Share to