डिजीटल ऑनलाईन सुविधा पुरविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात पहिली
पिंपरी (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडिया उपक्रम हा मूलत: भारत सरकारचा एक छत्री प्रकल्प आहे. यामध्ये विविध सरकारी कार्यालये आणि विविध संस्थाना सामावून घेतलेले आहे. या संकल्पनेतून विविध योजना ऑनलाईन पद्धतीने करून देशाला पुढे नेण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. यामुळे भारताला आता डिजिटल इंडिया म्हणून ओळखले जावू लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने डिजीटल इंडीयाचा एक जबाबदार घटक म्हणून डिजीटल इंडीया डिजीटल पीसीएमसीचा नारा दिला आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
यावेळी महापौर म्हणाल्या की, राज्यामध्ये ई-गव्हर्नन्समध्ये पिंपरी चिंचवड म.न.पा.स प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून पिंपरी चिंचवड शहर देशपातळीवर प्रगत औदयोगिक शहर म्हणुन ओळखले जाते. सध्या पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. डिजीटल इंडीया डिजीटल पीसीएमसी अंतर्गत आता महापालिकेमार्फत नागरिकांना ऑनलाईन मालमत्ता कर थकबाकी दाखला व तात्पुरत्या स्वरूपात जाहिरात परवाना देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून व नागरिकांना थकबाकी नसलेचा दाखला प्राप्त करुन घेणेकामी अर्ज करणे व दाखला प्राप्त करुन घेणेसाठी पुन्हा कर संकलन विभागीय कार्यालयात येणे. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय व वेळेचा अपव्यय या बाबी विचारात घेऊन, कर संकलन विभागामार्फत महानगरपालिकेचे www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर मालमत्ता कर थकबाकी नसलेचा दाखला देणेची ऑनलाईन सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देणेत येत आहे. सदर सुविधा महानगरपालिकेच्या संकेत स्थळावरील मुख्य पृष्ठावरील नागरिक या लिंकमध्ये मिळकत कर या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. मालमत्ता कर थकबाकी नसलेचा दाखला ऑनलाईन पध्दतीने देणेत येणार असल्याने नागरिकांना घर बसल्या दाखला प्राप्त होणार असलेने मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच शहराचे होणारे विद्रुपीकरण टाळण्यासाठी नागरिकांना आता वाढदिवस, श्रद्धांजली, शुभेच्छा, अभिनंदन व इतर जाहिरातींचे फ्लेक्स / बॅनर लावण्यासाठी महापालिकेमध्ये पारदर्शक ऑनलाईन पध्दतीने तात्पुरता जाहिरात परवाना देण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२२ पासून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. हा परवाना नागरिकांना म.न.पा.च्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी या संकेत स्थळावर “तात्पुरता जाहिरात परवाना” या ठिकाणी ऑनलाईन फॉर्मद्वारे जाहिरातीसाठी जागा निवडता येतील. यामध्ये ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभे करता येतील अशा निश्चित केलेल्या ११२ जागांची यादी दिलेली असुन त्यामधून नागरिकांना इच्छित जागांची निवड करता येईल. नागरिकांना या संकेतस्थळावर फॉर्म पुर्ण भरून झालेनंतर त्याची परवाना फी ऑनलाईन भरल्यानंतर लगेच त्या जागेचा परवाना संबंधितांच्या मोबाईलवर व मेल आयडीवर त्वरीत मिळणार आहे. याशिवाय आगामी काळात जे नागरिक वेळेवर मालमत्ता कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करतात अशा नागरिकांसाठी महापालिकेमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे Coupons, Incentive Points, Rewards system इ. योजना करावयाचे मनपाचे नियोजन आहे.