महापालिकेच्या जागेत 20 ठिकाणी ‘ईव्ही चार्जींग’ स्टेशन उभारणार, खासगी संस्थेचा पुढाकार

पिंपरी –  शहरातील नागरिकांना इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका २० ठिकाणी खाजगी एजन्सीद्वारे ईव्ही चार्जींग स्टेशन उभारणार आहे.  प्रशासक राजेश पाटील यांनी आज या विषयाला मंजूरी दिली.  स्वत: बांधा आणि संचलित करा या तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  यासाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नसून महापालिकेकडून संबंधित एजन्सीला केवळ जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  इलेक्ट्रीक वाहनांचा अधिक वापर होण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता महापालिकेने पुढाकार घेतला असून प्रदूषणमुक्त शहरासाठी हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.            

महाराष्ट्र शासनाच्या “माझी वसुंधरा” धोरणाअंतर्गत  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अपारंपारिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपुर्ण उपक्रमास चालना मिळण्याकरीता विविध उपाययोजना राबविणे तसेच नुतनीकरणक्षम उर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्याकरीता नवीन आणि अक्षय उर्जा मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांच्या आणि धोरणांच्या उपलब्धतेवर आधारित  नविकरणीय उर्जा प्रकल्प विकसित करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  याकामी महापालिकेमार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशन ७ वर्षे कालावधीकरिता २० ठिकाणी वाजवी दराने विभिन्न एजन्सींकडून स्वत: बांधा आणि संचलित करा (बिल्ड ऑपरेट अॅन्ड ओन) मॉडेलवर इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग सुविधा वाजवी दराने उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.  या एजन्सींना महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करुन देण्यात येईल.  या जागेवर ७ वर्षाकरिता स्वत:च्या खर्चाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून  वीज पुरवठा घेणे, ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे आणि त्या ७ वर्षाकरिता चालन व देखभाल करणे या बाबी एजन्सीने करणे आवश्यक राहील.  ग्राहकांसाठीच्या कमाल मर्यादा दराप्रमाणे प्रति युनिट १७ रुपये अधिक सेवावस्तूकर अशी रक्कम ही एजन्सी  चार्जिंग फी म्हणून ग्राहकांकडून वसूल करु शकते.  अटी शर्तीमध्ये नमुद केल्यानुसार वीज वितरण कंपनीच्या विद्युत वीजशुल्कात वाढ अगर घट झाल्यास त्यानुसार ग्राहकांकडून रक्कम एजन्सीने वसुल करण्यास मान्यता असेल.  या एजन्सीने ग्राहकांसाठी कमाल मर्यादा दरावरील महसूली वाटणीतील काही प्रमाणात रक्कम महापालिकेला या माध्यमातुन देणे आवश्यक आहे.  महसूली वाटणीतील अधिकतम रक्कम देणा-या एजन्सीला कामाचे आदेश देण्याचे नियोजन आहे. 

महापालिका पार्कींगच्या जागेमध्ये ईव्ही चार्जींग स्टेशन उभारण्याकामी जागा निश्चिती करण्यात आली असून यामध्ये पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात, पिंपरीतील सीट्रस हॉटेल जवळ, दुर्गादेवी टेकडी निगडी, वाहतुकनगरी, बर्ड व्हॅली संभाजीनगर, बजाज अॅटो जवळ, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल भोसरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरुनगर, मलनि:सारण केंद्र चिखली, राधास्वामी रोड चिखली, डॉ बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव कासारवाडी, निसर्ग निर्माण सोसायटी रिलायन्स मार्ट जवळ कोकणे चौक पिंपळे सौदागर, विंटेज सोसायटी पिंपळे सौदागर, योगा पार्क विबग्योर शाळा पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान पिंपळेगुरव, वंडर कार्स निसर्ग निर्माण सोसायटी कोकणे चौक पिंपळे सौदागर, भक्ती शक्ती बस टर्मिनल निगडी, एच ए कंपनी सब वे जवळ, सीएमई सीमाभिंतीलगत फुगेवाडी आणि संततुकाराम मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराजवळ ईव्ही चार्जींगसाठी जागा निश्चिती करण्यात आली आहे.

Share to