राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदासाठी अजित गव्हाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

  • माजी आमदार विलास लांडे यांची मुरब्बी खेळी
  • भोसरी मतदार संघाला तीन पदे मिळण्याची शक्यता

पिंपरी | अमोल शित्रे

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच नवचैतन्य प्राप्त होणार आहे. संजोग वाघेरे पाटील, विशाल वाकडकर, वैशाली काळभोर यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला शहरात नवीन नेतृत्व मिळणार आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या गटातील भोसरीचे मातब्बर नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्या टिममध्ये विधानसभानिहाय तीन कार्याध्यक्ष देण्यात येणार आहेत. गव्हाणे यांचे नाव देण्यात माजी आमदार विलास लांडे यांचाच हात असल्याची माहिती समोर येत आहे. गव्हाणे हे जरी शहराध्यक्ष झाले तरी भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहराच्या निवडणुकीत लांडे यांचाच वरचष्मा राहणार असल्याचे यावरून दिसते आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक अगदीच जवळ आलेली आहे. गेल्या पाच वर्षात पक्षाच्या विद्यमान पदाधिका-यांचे कार्य म्हणावे तेवढे प्रभावी ठरले नाही. महापालिकेतील सत्ताधारी भाजापाच्या भ्रष्ट कारभारात त्यांचा सहभाग असल्याच्या शेकडो बातम्या सोशल मीडियावर व वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद शहरात नामशेष झाल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाचे नेते तथा पिंपरी-चिंचवडचे कारभारी अजित पवार यांनी विद्यमान पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात पक्षाची ताकद निर्माण करण्यासाठी त्यांनी नवीन चेह-यांच्या हाती नेतृत्व देण्याचा विचार केल्याचे समजते.

परंतु, चुकीचा कारभार खरा असल्याचे सांगण्यात चलाखी करून चौखोर उधळलेला भाजपाचा वारू रोखण्यात नवखे चेहरे कमी पडतील याचा विचारही दादांनी केल्याचे समजते. गेल्या पाच वर्षात पक्षांतर्गत बंडाळी माजून पक्षाला पोखरण्याचे काम राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केले. दरम्यान, राष्ट्रवादी प्रभावहीन झाल्याचे पहायला मिळाले होते. कारण, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पंक्षातर्गत धुसफूस काही कामाची नाही. यासाठीच प्रभावी मजबूत नेतृत्व असणे काळाजी गरज आहे. याचा विचार करून अजितदादांनी माजी आमदार लांडे यांच्या वैचारिक मुद्यांचा अंतर्भाव करून गव्हाणे यांच्यावर जबाबदारी देण्याचा विचार केल्याचे दिसते.

गव्हाणे यांना शहराध्यक्ष पद दिल्यात जमा असून त्याची येत्या दोन तीन दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जोडीला पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभानिहाय कार्याध्यक्ष देण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. पिंपरी विधानसभेसाठी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, चिंचवड विधानसभेसाठी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि भोसरी विधानसभेसाठी पक्षात नव्यानेच दाखल झालेले विद्यमान नगरसेवक राहूल भोसले यांची निवड होणार असल्याचे समजते. महिला शहराध्यक्ष पदी कविता आल्हाट यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या नवीन निवडी पाहता शहरातील बहुधर्मीय समाजाचे नेतृत्व करणा-या व्यक्तींना न्याय दिल्याचे स्पष्ट होत आहे.

सर्वधर्मियांची एकजूट तयार करून माजी आमदार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यासाठी सक्रीय होणार असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीत माजी आमदार लांडे यांचा राजकीय करिष्मा पुन्हा एकदा शहरवासियांना पहायला मिळणार आहे. कारण गव्हाणे, आल्हाट आणि भोसले हे लांडे समर्थक मानले जातात. त्यांच्या निवडीमागे लांडे यांनी महत्वाची भूमिका निभावल्याची सुत्रांची माहिती आहे.

Share to