‘पीएमपीएमएल’च्या 117 कर्मचा-यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा – नगरसेविका माधुरी कुलकर्णी

  • नगर विकास विभागाकडून महापालिकेला आदेश
  • अमंलबजावणी करण्यासाठी आयुक्तांना देणार पत्र

पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. विभागाचे ११७ कर्मचारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत कामकाज करीत आहे. हे कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस वर्षाहून अधिक काळ महापालिकेची सेवा करीत आहेत. त्या सर्व कर्मचा-यांना महापालिका सेवेत सामावून घ्यावे, त्यांना इतर कर्मचा-यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ देण्यात यावा, असे आदेश नगरविकास विभागाने आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून सुरु असलेल्या ११७ कर्मचा-यांच्या लढाईला यश आले असून शासन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, यासाठी आयुक्त पाटील यांना पत्र देऊन पाठपुरावा करणार अशी माहिती नगरसेविका माधुरी कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नगरसेविका माधुरी कुलकर्णी म्हणाल्या की,  पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे महानगर पहिवहन महामंडळाचे सुमारे २३५ कर्मचारी सन २००१ पासून कामकाज करीत होते. त्यातील ११८ कर्मचारी सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झाले होते. ११७ कर्मचारी अद्यापही सेवेत कार्यरत आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा वेतन, भत्ते व अन्य सोयी सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ते घेत होते. मात्र, ते महापालिकेचे कामकाज करीत होते. त्यांची हजेरीची प्रतिपूर्ती दरमहिन्याला महापालिका पीएमपीएमएलकडे पाठवून देत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने चतुर्थ श्रेणीतील शिपाई, हेल्पर, क्‍लिनर, वाहन चालक, लेबर यांच्यासह अन्य पदनाम सर्व कर्मचाऱी महापालिका सेवेत काम करीत आहेत.

‘पीएमपीएमएल’ मधील ११७ कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात यावे, अशी कित्येक वर्षापासून त्या कर्मचा-यांची मागणी होती. त्यानूसार गेल्या चार वर्षापासून सर्व कर्मचा-यांना महापालिका सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु होता. त्याकरिता महापालिका सर्वसाधारण सभा आणि ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या सभेत ११७ कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कायमस्वरुपी सामावून घेण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.

तसेच, तो ठराव राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवून त्याला मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. दरम्यान, नगर विकास विभागाने ‘पीएमपीएमएल’च्या ११७ कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत समायोजित करुन नियमित कर्मचा-यानूसार त्यांना सर्व लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार ‘पीएमपीएमएल’ कर्मचा-यांना महापालिका सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याच्या शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच सर्व कर्मचा-यांना सामावून घेतल्याचे पत्र देण्यात यावे, अशी मागणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करणार आहे, असेही नगरसेविका कुलकर्णी यांनी सांगितले.

महापोर, पक्षनेते, विरोधी पक्षनेत्यांचेही योगदान

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. विभागाचे ११७ कर्मचा-यांना महापालिकेच्या सेवेत कायम स्वरुपी सामवून घेण्यासाठी महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, तत्कालिन विरोधी पक्षनेते स्व. दत्ताकाका साने, विद्यमान विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचे सहकार्य लाभले आहे, असेही नगरसेविका कुलकर्णी यांनी सांगितले.

 
Share to