माझे वडिल, चुलते भाजपासाठी आम्ही जीवाचे राण केले, आमच्यावर अन्याय… म्हणत रवी लांडगे यांचा राजीनामा

  • थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले पत्र

मा. चंद्रकात पाटील

प्रदेशाध्यक्ष,

भारतीय जनता पार्टी

विषय – भारतीय जनता पार्टीतील माझ्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत असलेबाबत.

माझे वडील दिवंगत बाबासाहेब लांडगे आणि चुलते दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्याकडून प्रेरणा घेऊन लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षात काम करायला सुरूवात केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप रूजवण्यासाठी माझे वडिल आणि चुलते या दोघांनीही फार कष्ट घेतले आहेत. त्यांचे हे कष्ट मी लहानपणी जवळून पाहिले आणि अनुभवले आहे. तेव्हापासूनच माझ्यावर भाजपचे संस्कार रुजले. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा राजकीय जन्म हा भाजपमधूनच झालेला आहे. मी पक्षात सक्रिय झाल्यापासून पूर्ण समर्पणाने काम केले. पक्षाशी कधी गद्दारी केली नाही. भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम केले. पक्षाच्या जुन्या निष्ठावंतांना ताकद देण्याबरोबरच नवीन कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले. पक्षहित लक्षात घेऊन नवीन आणि जुना असा कधीच भेदभाव केला नाही.

मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भोसरीतील धावडेवस्ती प्रभागातून बिनविरोध निवडून आलो. या पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष केला. यापुढेही करत राहणार आहे. पण लोकांना न्याय देत असताना पक्ष म्हणून खंबीरपणे साथीची गरज असते, तीच मिळत नसेल तर पक्षात राहून उपयोग नाही. महापालिकेच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रत्येक विकासकामांत भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचारच झालेला आहे. प्रत्येक कामांत रिंग करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना बळ दिले गेले आहे. चिखलीतील संतपीठ असो की नदी सुधार प्रकल्प असो की भोसरी उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रकल्प असो की कचरा डेपोवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प असो एकही काम असे नाही की जे भ्रष्टाचाराविना राबवण्यात आले आहे.

भाजपला भ्रष्टाचाराची ही सर्व देणगी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिलेली आहे. महेश लांडगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाची प्रतिमा भ्रष्टाचारी पक्ष असा झाली आहे. पक्षाची अशी प्रतिमा मलिन झालेली पाहून माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला फक्त त्याकडे बघत राहणे शक्य होत नाही. मी पक्षात राहूनही अनेकदा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला कडाडून विरोध केलेला आहे. भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मला पक्षाच्या निर्णयाविरोधातच रस्त्यावरची लढाई लढावी लागली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या सत्ताकाळात स्थायी समितीच्या सभापतीला लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली ही पक्षाला नाचक्की आणणारी घटना घडली. त्यावरून भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांमध्ये किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे आता पक्षात माझा राजकीय श्वास गुदमरतो आहे.

भ्रष्टाचाराला विरोध करणारे भोसरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची कटकारस्थाने केली गेली. माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाचे बळ कधीच मिळू दिले नाही. भारतीय जनता पार्टी हा पक्ष सत्ताधारी नव्हता त्यावेळी या पक्षात प्रवेश, तर लांबच साधे ढूंकूनही कोणी पाहायला तयार नव्हते. अशावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांनी कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता अत्यंत कठीण काळात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. पण पक्ष जेव्हा महापालिकेत सत्ताधारी बनला त्यावेळी गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत, तसे अनेकजण बाहेरून आले. आता तर पक्षाचे नेतृत्व बाहेरून आलेल्यांच्याच हातात गेले आहे. निष्ठावंतांवर लादले गेलेले हे बाहेरचे नेतृत्व स्वार्थी आहे, याचा पक्षाच्या नेत्यांना विसर पडला. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर अनेकदा गाऱ्हाणे मांडूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. पाच वर्ष सतत होणारा अन्याय सहन केल्यानंतर आणि पक्षाचे नेतेही अन्याय करणारांना पाठबळ देत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीतील माझ्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. 

कळावे

आपला

रवि बाबासाहेब लांडगे

Share to