अटलबिहारी वाजपेयी विधवा, घटस्फोटित योजनेतील वयाची अट रद्द करा
माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. अटलबिहारी वाजपेयी विधवा/घटस्फोटित योजनेंतर्गत विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतले असल्यास २५ हजार रुपयांचे आणि प्रशिक्षण घेतले नसल्यास १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट अडचणीची ठरत आहे. याबाबत माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
अटलबिहारी वाजपेयी विधवा/घटस्फोटित योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय अर्ज केलेल्या दिनांकास ५० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. या अटीमुळे या योजनेला लाभार्थी महिलांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ५० वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे योजनेतील वयाची अट रद्द करावी. सर्वच वयोगटातील विधवा/घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा. पालिका आयुक्तांनी तशी दुरुस्ती करावी, असे या निवेदनात शैलजाताई मोरे यांनी म्हटले आहे.