अखेर विद्यार्थ्यांची चार किलोमिटरची पायपीट थांबली
- इस्लामपूर आगाराच्या ऐतवडे बुद्रुक मार्गे दोन एसटी पुन्हा सुरू
- तरूण ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्याला यश
महाईन्यूज : प्रदीप लोखंडे
वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक गावातील विद्यार्थ्यांची लाडेगाव फाटा ते ऐतवडे बुद्रुक गावापर्यंत तब्बल चार किलोमिटरची होणारी पायपीट आता थांबणार आहे. इस्लामपूर एसटी आगाराकडून कोरोना काळात बंद झालेल्या दोन एसटी सेेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या एसटी सुरू कराव्यात यासाठी ग्रामपंचायतचे तरूण सदस्य संदीप गायकवाड आणि महेश कांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला कर्मवीर ग्रामविकास पॅनेलच्या नेतेमंडळींची साथ मिळाली. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. आगाराकडून 13 फेब्रुवारीपासून दोन एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
ऐतवडे बुद्रुक गावात एसटी दाखल झाल्यानंतर संबंधीत वाहक आणि चालकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप गायकवाड, महेश कांबळे, अरविंद बुद्रुक, अजिंक्य पाटील, जगन्नाथ साळुंखे, दीपक कुंभार, जयश्री पाटील, रेश्मा गुरव, प्रियांका शेटे, माजी सरपंच सलीम जमादार, संग्राम गायकवाड, अतुल गुरव, सचिन पाटील, दादासो कांबळे, नंदकुमार गायकवाड, आनंदराव गायकवाड आदीसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
ऐतवडे बुद्रुक ते इस्लामपूरला प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. विद्यार्थी, नोकरदार आदीसह विविध नागरिक सातत्याने ये-जा करतात. सकाळी महाविद्यालयासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इस्लामपूरवरून दुपारी गावी येण्यासाठी दुपारी एक आणि पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एसटीची सुविधा होती. कोविड काळात या एसटी बंद करण्यात आल्या होत्या. सध्या कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तरी देखील एसटी सुरू करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाडेगाव पर्यंत असणाऱ्या एसटीने यावे लागत होते. तिथून चार किलोमिटर पायपीट करत गावात यावे लागत होते. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता.
इस्लामपूर आगार व्यवस्थापकांसमोर या अडचणींबाबत संदीप गायकवाड आणि महेश कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी गाऱ्हाणे मांडले. सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्या पाठपुराव्याला यश आले. दुपारी एक वाजता इस्लामपूर ते करंजवडे आणि पावणे तीन वाजता इस्लामपूर ते कोडोली ही ऐतवडे बुद्रुक मार्गे असणारी एसटी सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
प्रदीप लोखंडे, संपादक
संपर्क – 7350266967