ढगेवाडीत दलबदलू राजकारणाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना बसणार फटका

  • प्रमुख नेत्यांविरोधात गावात खदखद ; ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राग व्यक्त होणार

महाईन्युज | प्रदीप लोखंडे

सांगली जिल्ह्यातील ढगेवाडी गावात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक गटाविरोधात नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. या गटाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याने अनेक वेळा शब्द फिरवला, असा आरोप विरोधी गटातील नेतेमंडळी करत आहेत. या गोष्टीमुळे हा राग उफाळून येणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या पाटील-नाईक गटाने सरपंच पदाची स्वप्ने पाहिली असली तरी गावातील राष्ट्रवादीच्या त्या नेत्याच्या विरोधात मतदान होण्याची शक्यता आहे.

ढगेवाडी गावात सात ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात. सध्या लोकनियुक्त सरपंच अशा एकूण आठ जणांची मिळून ग्रामपंचायत कार्यकारीणी असणार आहे. गावात तीन वार्ड आहेत. या मध्ये महिलांसाठी तीन आणि पुरुषांसाठी ४ जागा आरक्षित आहे. सरपंच पद खुला प्रवर्ग पुरुषसाठी आरक्षित आहे. गावात राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांचा एक गट तर माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचा दुसरा गट आहे. गावात महाडिक बंधूंचे समर्थक देखील आहेत. तर भाजपाच्या सत्यजित देशमुख यांचा देखील गट आहे. प्रत्येक निवडणुकीत इतर गटाशी हातमिळवणी करण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक गट यशस्वी होत आहे.

गेल्या निवडणुकांपासून या गटातील नेत्यांनी मित्रपक्षातील नेत्यांशी दलबदलु राजकारण केल्याचा आरोप गावातील इतर नेते करत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सरपंच होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रदेशाध्यक्ष पाटील, आमदार नाईक गटाच्या नेत्या विरोधात रोष व्यक्त होण्याची शक्यता आहे. काही नेते इतर गटाला अडीच वर्ष सरपंच पद देऊन ऑफर देत आहेत. मात्र त्यांच्या फसव्या राजकारणाला कोणी बळी पडेना झाले असल्याचे चित्र आहे.

सध्या गावात भाजपाचे सत्यजित देशमुख, महाडिक समर्थक आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक गट एकत्र येऊन निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक गटाला मोठे आव्हान उभे केले जाईल.

ग्रामपंचायतीत दाखल्यासाठी अडवणूक
गेल्या पाच वर्षात ढगेवाडी ग्रामपंचायतीमध्ये विविध दाखल्यांसाठी गेलेल्या नागरिकांची काही नेत्यांकडून अडवणूक केली जात होती. आपल्या मर्जीतील नागरिक असतील तर त्यांना त्वरित दाखले दिले जात होते. इतरांना मात्र विनवणी करूनही दाखले दिले जात नव्हते. याचा राग नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

हातमिळवणी करायला पुढाकार घेईना

दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपली अडचण होणार असल्याचे दिसते. त्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन कोणीही कोणाकडे जाताना दिसत नाही. त्यामुळे गावात निवडणुकीचे चित्र कसे असेल हे अद्याप तरी अस्पष्टच आहे.


  • प्रदीप लोखंडे, संपादक, महा ई न्यूज.
  • मो. नं : ७३५०२६६९६७
Share to