क्रुझ ड्रग्ज प्रकरण : अखेर किरण गोसावीचा ठावठिकाणा लागला, उत्तर प्रदेशात लपून बसल्याचे उघड
मुंबई – आर्यन खान अटक प्रकरणातील फरार पंच किरण गोसावीचा ठावठिकाणा लागला आहे. किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये लपून बसला असल्याची माहिती समोर आली आहे. किरण गोसावीवर आधीच पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्यानंतर अखेर किरण गोसावीचा पत्ता लागला आहे.
दोनच दिवसांपूर्वी पंच प्रभाकर साईलने किरण गोसावीवर आर्यन खान अटक प्रकरणात 25 कोटींची लाच मागितली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली. अखेर या प्रकरणी किरण गोसावी याने सर्व आरोप फेटाळून लावले. किरण गोसावी हा सध्या उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये मुक्कामी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका सुरू केल्यानंतर किरण गोसावी हा फरार झाला होता. एवढंच नाहीतर तो दिल्लीत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. पण, अखेर किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमध्ये जाऊन लपलेला असल्याचं समोर आलं आहे.
‘क्रुझवर जेव्हा कारवाई करण्यात आली. त्याअगोदर मला मला माहिती मिळाली होती. त्यानुसार मी एनसीबीला माहिती दिली. त्यानंतर क्रुझवर कारवाई करण्यात आली. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता. तर, तो क्रुझवर काढला होता. असा दावाही गोसावीने केला आहे. प्रभाकर साईलने 25 कोटींच्या खंडणीचे केलेले आरोप निराधार आहेत. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेट झाली नाही. त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती, असा दावाही त्याने केला.