दारूबंदीसाठी राज्य उत्पादन शुल्क आज ऐतवडे बुद्रुक मध्ये धडकणार

महिलांच्या सह्यांची होणार पडताळणी

सांगली ! प्रदीप लोखंडे

गावात दारूबंदी व्हावी यासाठी ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यासाठी महिलांच्या सह्या देखील घेण्यात आल्या होत्या. या सह्यांची पडताळणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आज गावात दाखल होणार आहेत. पडताळणी झाल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. 

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी दरम्यान ऐतवडे बुद्रुक मध्ये महिला ग्रामसभा पार पडली. या मध्ये दारू बंदीचा ठराव करण्यात आला. ठरावावर महिलांच्या सह्या घेण्यात आल्या. हयात नसणारे आणि बाहेर असणारे असे वगळून गावातील सुमारे १ हजार पेक्षा अधिक महिलांच्या म्हणजे जवळ सर्वच महिलांच्या दारूबंदी साठी सह्या झाल्याची माहिती आहे. याचा एकत्रित अहवाल वाळवा तहसीलदारांना पाठवून त्याची शहानिशहा केली जाणार आहे. त्यानंतर गावात दारूबंदीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. 

याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क सांगली यांना कळवले होते. त्यांचे पथक या सह्यांची पडताळणी करण्यासाठी दाखल होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत  ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वार्डनिहाय  ही पडताळणी केली जाणार आहे. तरी गावातील तरुण मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते व गावातील सर्व नेते मंडळी यांनी राजकारण बाजूला ठेवून गावातील दारूबंदी व्हावी, यासाठी एकत्रित यावे असे आवाहन उपसरपंच संदीप गायकवाड यांनी केले आहे. तसेच महिलांना ग्रामपंचायत मध्ये सह्यांची पडताळणीसाठी येण्यासंदर्भात प्रोत्साहित करावे, असेही ते म्हणाले.

——————————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज

मो. नं : 7350266967

Share to