इस्लामपूर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाला दिसेना गांजा आणि गांजाडे 

कुरळप पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीत वाढ ; कारवाईकडे दुर्लक्ष

सांगली : प्रदीप लोखंडे

इस्लामपूर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध गावात गांजा विक्रीत वाढ झाली आहे. कुरळप पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील राजरोसपणे गांजाचा बाजार होत आहे. त्याला आळा घालण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे गांजा आणि गांजाडे (गांजाचे व्यसन करणारे) वाढले आहेत. नशा करून तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. पोलिस प्रशासन देखील कारवाई करण्याकडे कानाडोळा करत आहे. 

किलोने मिळणाऱ्या गांजाची एकेक ग्रॅमने विक्री केली जात आहे. तंबाखूमधून गांजा ओढल्यानंतर दिवसभर नशा राहत आहे. तसेच सहजपणे गांजा मिळत असल्याने अनेक जण नशेसाठी गांजा ओढतात. एक ग्रॅमची पुडी सुमारे १५० रुपयाला विकली जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तरुणांची पिढी गांजाच्या नशेत वाहत गेली आहे. गावागावातील बंद पडलेल्या शाळा, स्मशानभूमी, पडकी बांधकामे, नदीकाठी, झाडा-झुडूपात गांजा ओढणारे बसत आहेत. नशा केल्यानंतर तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे. नशेसाठी कोणताही गुन्हा करण्यास मागे-पुढे पाहत नाही. 

गांजाची नशा करून तरुणांचे टोळके दिवसाढवळ्या हिंडत आहेत. मात्र इस्लामपूर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडून कारवाईकडे दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे नशा करणारे वाढतच आहेत. गांजा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करून जेलची हवा खायला लावल्यास याला आळा बसण्याची शक्यता आहे. दिखावा न करता कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र इस्लामपूर पोलिस उपअधीक्षक कार्यालय या बाबत गंभीर होणार का असा प्रश्न आहे.

या ठिकाणी भरतोय अड्डा –

कुरळप पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्रास गावात गांजाचे व्यसन करणारे वाढले आहेत. परिणामी गुन्हेगारी देखील वाढली आहे. कुरळप येथील बाजार कट्टा, त्याच्या शेजारील मोकळ्या जागेत, ऐतवडे खुर्द येथील नदीकाठ परिसर, ऐतवडे बुद्रुक येथील स्मशानभूमी, गावाबाहेरील वडाच्या झाडाखाली गांजा ओढणारी टोळकी बसत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या गावांचा प्रातिनिधिक स्वरूपात उल्लेख केला असला तरी सर्रास गावात हेच चित्र असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत शहानिशहा करून प्रत्यक्ष छापा मारण्याचे काम कुरळप पोलीस ठाण्याकडून होणे गरजेचे आहे. मात्र ते न झाल्याने या भागात व्यसनाबरोबर गुन्हेगारी देखील वाढतच आहे.

———————————–

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज

मो. नं – 7350266967

Share to