ऐतवडे बुद्रुक मध्ये ‘दारू’चा उतारा
– दारूबंदीसाठी ९०५, सुरू राहण्यासाठी ७९ महिलांचे मतदान ; बाटली उभीच !
सांगली ! संपादकीय
सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) गावात दारूबंदीसाठी महिलांच्या निर्धाराने आणि तरुणांच्या प्रयत्नांतून दारूबंदीसाठी मतदान झाले. त्या मध्ये एकूण ९९६ महिलांनी मतदान केले. या मध्ये दारू बंद व्हावी म्हणून ९०५ महिलांनी मत नोंदविले. ७९ महिलांनी दारू सुरूच राहावी या बाजूने मत दिले. तर उर्वरित १२ मते बाद झाली. दारू बंद होण्यासाठी सुमारे ९७८ मते अपेक्षित होती. तेवढी मते न पडल्याने गावात दारूचाच उतारा चालला आणि दारूची बाटली आडवी न होता उभीच राहिली.
या प्रक्रियेला नेमकी सुरुवात कशी झाली हे पाहणे गरजेचे आहे. गावात प्रजासत्ताक दिनाला २६ जानेवारी रोजी महिला ग्रामसभा पार पडली. या मध्ये गावात दारू बंदी करण्यासाठी महिलांनी आग्रह धरला. तेव्हापासून हा विषय सुरू झाला. उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, अजिंक्य पाटील आदीसह काही तरुणांनी पुढाकार घेतला. गावात महिलांच्या सह्या घेऊन प्रस्ताव तयार केला. सर्व शासकीय नियमांचे सोपस्कार पूर्ण केले. दारूबंदीसाठी जनजागृती केली. दारू बंद व्हावी म्हणून मोठा प्रतिसादही मिळाला. गावातून दारू हद्दपार होईल, असे चित्र होते. मात्र मतदान झाले आणि निकालात तांत्रिक दृष्ट्या दारूच जिंकली.
दारू पिल्यानंतर जशी झिंग येते. तसाच रंग या मतदानाच्या प्रक्रियेला देखील होता. व्यावसायिक स्पर्धेतून ही प्रक्रिया राबवली गेली. पक्षीय राजकारण झाले. श्रेय वादाचे राजकारण होते, अशा अनेक चर्चा आता आणि सुरुवातीपासूनच रंगल्या होत्या. त्यामुळे दारू बंदीसाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या विरोधी काम करणारा देखील गट अप्रत्यक्ष तयार होणार हे साहजिकच होते. तसे झालेही. हे काहीही असले तरी प्रश्न हा आहे की दारू बंद होण्यासाठी मतदानाची प्रक्रिया असावी का ?
दारू बंदी हा एका दिवसाचा विषय नाही. वास्तविकता राज्य शासनाला मोठा महसूल शासनमान्य दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून मिळतो. त्यामुळे शासन दारू बंद करा, असे कधीच सांगणार नाही. ज्यांनी शासनाकडे अर्ज करून पैसे खर्च करून बियर बार, देशी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ते साहजिकच आपला व्यवसाय सुरू रहावा, यासाठी प्रयत्न करणार. लाखो रुपये गुंतवून व्यवसाय बंद करावा लागत असेल तर होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असाही प्रश्न असतोच. त्यामुळे दुसरीकडे निवडणूक प्रक्रिया शासनाने केवळ नाममात्र थोपवली आहे.
मुळात हा लोक चळवळीचा, प्रबोधनाचा विषय आहे. तो दररोज राबविणे गरजेचे आहे. दारु अती प्रमाणात प्यायल्यामुळे किडणीचा आजार, लिव्हर आदीसह विविध गंभीर आजार होतो. ते सतत लोकांना सांगावे लागेल. आरोग्य शिबीर ठेऊन तज्ञ लोकांकडून नेमके दुष्परिणाम काय आहेत, याची सातत्याने लोकांना माहिती द्यावी लागेल. यासाठी वेळ जाऊ शकतो. लोक हसतील. चेष्टा होईल. मात्र त्याकडे लक्ष न देता हे सामाजिक काम अखंड सुरू ठेवले पाहिजे. दारू पासून लोकांना स्वतःहून मनापासून परावृत्त करणे या चळवळीची गरज आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या कामासाठी वाहून घेतले आहे. डॉ. अभय बंग, राणी बंग हे त्यापैकी एक नाव आहे. अशी अनेक नावे आहेत. जो पर्यंत नागरिक स्वतःहून दारूच्या व्यसनापासून दूर होत नाहीत तोपर्यंत ही लढाई कायमच राहील, ही वस्तुस्थिती आहे. मतदानातून दारू केवळ तांत्रिक दृष्ट्या बंद होईल. पण दारुसाठी आम्ही दुसऱ्या गावात चालत जाऊन दारू पिऊ, या दारू पिणाऱ्यांच्या मानसिकतेचं काय करायचं असा प्रश्न उरतोच !
असो हे काहीही असले आणि कितीही ज्ञान देणारे असले तरीही ऐतवडे बुद्रुक मध्ये ज्या तरुणांनी दारूबंदीसाठी लढा दिला त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे. दारुचा घोट पिऊन आपल्या माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त न होण्यासाठी मतदान करणाऱ्या महिलांना चांगले काम केल्याचे समाधान मिळेल. पण ज्यांनी विरोधात मत दिले त्यांना मात्र चुकीचे काम केल्याची खंत मात्र निश्चितच असेल !
——————-