कोल्हापूर : विवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पुणे – कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील कुंबळहाळ येथील एका विहिरीत एका 25 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळला आहे. घरी कोणीच नसताना पीडित महिलेनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून विहिरीतील पाणी उपसा करून महिलेचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला आहे.

गीता शिवलिंग नवलाज असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गीताचा मृतदेह घराजवळील एका विहिरीत आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता यांचा पती शिवलिंग नवलाज हा रविवारी सकाळी उसतोडणीसाठी घरातून लवकर बाहेर पडला. त्यांचे सासरे देखील कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, गीता एकट्याच घरी होत्या. यावेळी त्यांनी घराजवळील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

नवरा आणि सासरे घरी आल्यानंतर त्यांनी गीताचा शोध घेतला. तरी, काहीही थांगपत्ता लागला नाही. तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली असावी, असा संशय आला. विहिरीतील पाण्याचा उपसा केला असता, गीता यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share to