आई-वडिलांचा धर्म जाहीर करत समीर वानखेडे यांचं मंत्री नवाब मलीक यांना उत्तर

मुंबई – एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी आपल्या आईवडिलांच्या धर्माविषयी आणि स्वतःच्या वैवाहिक आयुष्याविषयीची माहिती जाहीर केली आहे.

आर्यन खान अटक आणि क्रूझ ड्रग्ज प्रकरणाबाबत एनसीबी आणि समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले आहे. आपले वडील हिंदू होते आणि आई मुस्लीम होती, असं सांगत आपण भारतीय पंरपरेतील एका संमिश्र आणि बहुधर्मीय धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर समीर दाऊद वानखेडे असं नाव घेत फर्जीवाडा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर आता वानखेडेंनी उत्तर दिलं आहे. शिवाय आर्यन खान प्रकरणातील एका पंचाने समीर वानखेडेंवर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. एनसीबीने हे आरोप फेटाळले असून समीर वानखेडेंनी त्यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत आरोपांना उत्तर दिलं आहे.

माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे 30 जून 2007 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यातून निवृत्त झाले. माझी आई स्वर्गीय झहीदा या मुस्लीम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असून आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान आहे, असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.

Share to