सुनील शिंदे, गोपिकिशन बाजोरिया यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी, रामदास कदमांचा पत्ता कट

मुंबई – विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे, तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्ता कट झाला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. त्यानंतर शिंदे यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, आता विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने मुंबईतून शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत सेनेकडे अधिक नगरसेवक असल्याने भाजप एक जागा लढवणार आहे.

अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी त्यांची भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याशी लढत होणार आहे. ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुनील शिंदे हे २००७ मध्ये मुंबई महापालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. २०१४ मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत ६० हजार ६२५ मतं मिळाली होती. तर सचिन अहिर यांना ३७ हजार ६१३ मतं मिळाली होती. २०१५ मध्ये त्यांच्याकडे उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Share to