पुणे : पन्नास लाख लसीच्या डोससाठी पालिकेने केली एवढी रक्कम खर्च
पुणे – पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली आहे. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे. तर 35 टक्के लोकांना विकतची लस देण्यात आली आहे. यासाठी तब्बल 141 कोटी 26 लाख 53 हजार 15 रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.
16 जानेवारी 2021 पासून केंद्र सरकारने देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात केली. लस कोणाला द्यायची याबाबत सुरुवातीच्या काळात अनेक बंधणं होती. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी दिली. केंद्र सरकारकडून मोजक्या प्रमाणात लशी वितरीत केल्या जात होत्या.
पण गेल्या काही काळापासून देशात कोरोना लशीचा मुबलक प्रमाणात पुरवठा होतं असून व्यापक स्तरावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. शनिवारी शहरात 22 हजार 399 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यामुळे सध्या पुण्यात लसीकरणाचा आकडा 50 लाख 20 हजार 78 वर पोहोचला आहे. शहरात आणखी 12 लाख डोसचं लसीकरण होणं अपेक्षित असून, यामध्ये दुसऱ्या डोसवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून सांगण्यात आली.
पुणे महापालिकेनं 22 ऑक्टोबरपर्यंत 32 लाख 83 हजार 653 डोस मोफत दिले आहेत. तर उर्वरित 17 लाख 36 हजार 425 डोस खासगी रुग्णालयातून सशुल्क देण्यात आले आहेत. या लसीकरण मोहीमेसाठी महापालिकेनं तब्बल 141 कोटी 26 लाख 53 हजार 15 रुपये खर्च केले आहेत.