‘तो कोणाशी पंगा घेतोय’, ‘100 सलमान गल्ली झाडायला दारात उभे करेन’ – अभिजित बिचुकले

पुणे (प्रतिनिधी) – अभिनेता सलमान खान आणि बिग बॉस स्पर्धक अभिजित बिचुकले यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचुकले यांनी सलमान खान यांच्यावर गंभीर आरोप करत, ‘सलमान खान अजून अंड्यात आहे. तो कोणाशी पंगा घेतोय त्याला माहित नाही. असे 100 सलमान मी गल्ली झाडायला दारात उभे करेन’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अभिजित बिचुकले यांना वाईल्ड कार्ड एन्ट्रीने बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळाला होता. घरातून बाहेर पडल्यानंतर बिचुकले यांनी सलमान खान यांच्यावर गंभीर टीका केली.

अभिजित बिचुकले म्हणाले, ‘मी शिवी दिल्यानंतर त्याचा बाऊ करण्यात आला. नंतर सलमान खान नावाची जी कोणी व्यक्ती आहे तो स्वत:ला काय समजतो माहिती नाही, पण त्याला अजून अभिजीत बिचुकले काय हे कळलं नाहीये. महाराष्ट्रातील नेत्यांना अभिजीत बिचुकले कोण हे माहिती आहे. सलमान खान अजून अंड्यात आहे, अजून अंड्याबाहेर यायचं आहे. त्याला कळेल अभिजीत बिचुकले कोण आहे ते आणि कोणाशी पंगा घेतोय. त्याला काय ते दिल्लीतून आलेले गायक वैगेरे वाटले का ? मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्यातील गादीचा वैचारिक वारस आहे. शाहू, फुले, आंबेडकांना मानणारा मी आहे. असे 100 सलमान मी गल्ली झाडायला दारात उभं करेन.’

बिचुकले पुढे म्हणाले, ‘मी स्वत:हून बाहेर पडायला लागलो होतो. मी जेव्हा बाहेर पडणार होतो तेव्हा बिग बॉसने विनंती करून थांबवलं होतं. आता त्यांच्या नियमानुसार काढलं आहे. याबद्दल मला काही शंका आणि मनात गोष्टी आहेत. त्या मी पत्रकार परिषदेत मांडणार आहे,’ अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

Share to