महाडिक गटाच्या एन्ट्रीने येडेनिपाणीत चुरस वाढणार
- परिवर्तन पॅनेलच्या मार्फत 5 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता
महाईन्यूज ! प्रदीप लोखंडे
सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणीत ग्रामपंचायत निवडणूकीची रंगत वाढणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी महाडिक गटाची देखील आता एन्ट्री होणार आहे. परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून डॉ. सचिन बी. पाटील हे ५ जागांवर इच्छुक उमेदवार देऊन कडवे आव्हान देतील अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीत देखील अंतर्गत गट आहेत. त्याचा फायदा देखील होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी त्याला कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
येडेनिपाणी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचारांचा सरपंच बसतो. गावात राष्ट्रवादीतच गटतट असून ते ऐकमेकांविरोधात उमेदवार उभे करतात. सध्या गावात ५ वॉर्ड आहेत. १५ ग्रामपंचायत सदस्य व एका लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सरपंच पद यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये डॉ. प्रकाश पाटील, डॉ. सचिन पाटील यांचे राष्ट्रवादीचे गट आहेत. तर नंदकुमार पाटील हे राष्ट्रवादीशी संलग्न आहेत. गावात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा देखील गट सक्रिय आहे. या मध्ये आता परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून डॉ. सचिन पाटील यांनी निवडणुकीत जोरदार एन्ट्री केली आहे.
डॉ. सचिन बी पाटील हे कट्टर महाडिक समर्थक आहेत. सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांच्या नेतृत्वात त्यांनी गावात नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम केले आहे. सामाजिक कामात देखील त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत भाजपाकडून त्यांना तालुकाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली आहे. गावात बांधणी करत त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहे. सध्या तरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून एकला चलो रे भूमिका घेतली आहे. गावात ५ उमेदवार उभे करून सत्ताधाऱ्यांना ते सळो की पळो करतील अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादीतील मतविभागणीचा फायदा घेऊन महाडिक गट गावात झेंडा रोवणार का हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
डॉ. सचिन बी पाटील सामाजिक कामाचा आराखडा मांडणार –
महाडिक समर्थक डॉ. सचिन बी. पाटील यांनी गावात कोरोना काळात घरी जाऊन सेवा, अनेकांना विनामूल्य औषध उपचार दिले. एसटी प्रवासी सोय करून दिली आहे. कोरोना काळात पोलिसांसाठी २१ कॅम्पचे आयोजन केले. सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूर काळात ६ गावात आरोग्य कॅम्पचे आयोजन केले. ही सामाजिक घेऊन नागरिकांपर्यंत ते पोचणार आहेत.
सरपंच पदावर राष्ट्रवादीच ?
गावात महाडिक गट, सदाभाऊ खोत आणि नंदकुमार पाटील गट एकत्र येऊन निवडणूक लढल्यास राष्ट्रवादीला तगडे आव्हान उभे राहिले असते. गावात देखील तशी चर्चा रंगली होती. मात्र हे तीनही गट एकी करण्याबाबत सध्या तरी अनुत्सुक दिसत आहेत. असे झाले तर त्याचा फायदा पुन्हा राष्ट्रवादीलाच होईल, असे चित्र आहे. यंदाही राष्ट्रवादीच्या विचारांचा सरपंच होईल, असे चित्र आहे.
प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
मो. नं – 7350266967