प्रतीक पाटील यांच्या दिमाखदार लग्न सोहळ्याने उपस्थितांचे डोळे ‘दीपावले’

  • राज्यातील बड्या नेत्यांची इस्लामपुरात उपस्थिती
  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ‘परफेक्ट’ नियोजनाची राज्यभर चर्चा

महाईन्यूज ! प्रदीप लोखंडे

प्रवेशद्वारापासून लग्न मंडपापर्यंत आकर्षक फुलांची सजावट… सूर्य मावळतीला जाताना मन मोहून घेणाऱ्या रंगीबेरंगी ‘लाईटस’… लग्न सोहळा मंडपात सुरु असलेला सनईचा मधुर सूर… सभेला जमावी एवढी भली मोठी माणसांची शिस्तबद्ध गर्दी… समोरच्या रांगेत राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती…फुलांच्या रुपी लहानथोरांचा मिळणारा आशीर्वाद असा दिमाखदार लग्नसोहळा सांगली जिल्ह्यासह राज्याला अनुभवायला आणि पाहायला मिळाला. अगदी एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटावा असा लग्नसोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील आणि अलिका किर्लोस्कर यांचा पार पडला. हा लग्न सोहळा सांगली जिल्ह्यासह राज्यातील अनेकांचे डोळे दीपावणारा ठरला आहे. एवढ्या भल्या मोठ्या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ‘परफेक्ट’ नियोजनाची चुणूक राज्यालाही दाखवली आहे.

इस्लामपुरातील कार्यक्रम कोणताही असो, अन तो राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा असेल तर विषय खोलच. जयंत पाटील हे राजकारणातील ‘सिन्सिअर’ नेतृत्व आहे. त्यांच्या स्वभावानुसार त्यांचे सगळ्याच कार्यक्रमात चोख नियोजन असते. मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा सामाजिक असो किंवा राजकीय असो किंवा एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा असो.. सगळी कामे जयंत पाटील अगदी चोखपणे पार पाडतात. त्यांच्या याच चोखपणाचे दर्शन रविवारी २७ नोव्हेंबर रोजी दिसले. चिरंजीव प्रतीक पाटील आणि अलिका किर्लोस्कर यांच्या लग्नसोहळ्याचे उत्तम नियोजन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनात झाले. लग्नसोहळ्याला मोजता न येईल एवढ्या हजारो लोकांची उपस्थिती होती. त्यांच्या जेवणाची देखील शिस्तबद्ध सोय केली होती. कुठेही गडबड, गोंधळ दिसला नाही. या लग्नसोहळ्याने जिल्ह्यातील लोकांच्या डोळ्यांचे पारणे तर फ़िटलेच. मात्र राज्याने देखील एक अनोखा सोहळा पाहिला.

हा सोहळा पाहून अनेकांना एकच वाटले असेल… ‘काय ती माणसांची शिस्तबद्ध गर्दी…काय तो भव्य मंडप…काय त्या लेझरच्या लाईट…काय ते बडे नेते…काय ते जयंत पाटील यांचं नियोजन…प्रतीक पाटील यांचं लग्न म्हणजे एकदम ओक्केच.

…अन जयंत पाटील यांचे डोळे पाणावले

लग्नसोहळा सुरु करताना उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. या वेळी आपले वडील दिवंगत राजारामबापू पाटील व आई दिवंगत कुसुमताई पाटील यांचे स्मरण करताना जयंत पाटील काही वेळ स्तब्ध राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यानंतर या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याही नावाचा उल्लेख करताना जयंत पाटील यांचा कंठ दाटून आला होता. यामुळे काही काळ वातावरण भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

या नेत्यांची उपस्थिती

लग्नसोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री शंभूराजे देसाई, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, माजी मंत्री नितीन राऊत, विक्रमसिंग पाटणकर, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, फौजिया खान, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, गणेश नाईक, संजय पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील आदींसह राज्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.

  • प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
  • मो. नं – ७३५०२६६९६७
Share to