कुरळप ग्रामपंचायतमध्ये ‘दादा’च्या बालेकिल्ल्याला ‘तात्या’चा सुरुंग ?

  • पीआर पाटील पॅनेल विरोधात अशोक पाटील सर्व जागांवर पॅनेल देणार

महाईन्यूज ! प्रदीप लोखंडे

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पीआर पाटील (दादा) म्हणजे राजकारणातील कसलेले पैलवान. आपल्या गावचा बालेकिल्ला मजबूत करत त्यांनी आजूबाजूच्या परिसरातही आपला अप्रत्यक्ष वचक ठेवला आहे. त्यांना तगडा स्पर्धक निर्माण होईल की नाही असे वाटत असताना कुरळप गावातूनच अशोक पाटील (तात्या) यांनी शड्डू ठोकला. मैदानात कुस्तीचा डाव मारता मारता त्यांनी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली आणि पीआर पाटलांची डोकेदुखी वाढवली. प्रत्येक निवडणुकीत पीआर पाटलांना अशोक पाटलांनी आव्हान दिले. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीला तर सर्वच जागांवर उमेदवार देण्याची तयारी अशोक पाटील यांनी केली आहे. इच्छुक उमेदवारांची देखील मोठी संख्या असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यामुळे यंदा कुरळपच्या राजकीय आखाड्यात चांगल्याच कुस्त्या रंगणार आहेत. या कुस्तीमध्ये डाव टाकून अशोक पाटील पीआर पाटलांना चितपट करतील की, पीआर पाटीलच विजयाचा मुकुट घालून आपला वस्ताद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत हे सिद्ध करतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सांगली जिल्ह्यातील कुरळप गावात निवडणुकीची रंगत वाढणार आहे. १५ ग्रामपंचायत सदस्य तर एक लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सरपंच पदासाठी ओबीसी पुरुष हे आरक्षण जाहीर झाले आहे. गावात पीआर पाटील आणि अशोक पाटील या दोघांचे पॅनेल असणार आहे. अनेक निवडणुकांमध्ये अशोक पाटील यांनी पीआर पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अशोक पाटील यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही. निवडणुकीसाठी उमेदवार देखील भेटत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे त्यांचे केवळ २ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले. गावात सत्ता आणायची असेल तर आणखीन कामे करायला हवी, या उद्देशाने अशोक पाटील यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली आहे.

कोरोना काळात सुमारे २० लाख रुपयांपर्यंत त्यांनी किटचे वाटप केले. या मध्ये धान्याचे किट, आरोग्याची सुरक्षा साधने, नवरात्र उत्सवात फराळाचे वाटप, घरोघरी अंडी वाटप, १० वी, १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना वही वाटप आदीसह अनेक कामे त्यांनी केली. त्याचा सकारात्मक परिणामही दिसत असल्याचे अशोक पाटील समर्थक सांगत आहेत. दरम्यानच्या काळात गावात तीन नंबर वॉर्डात ग्रामपंचायतीला लागलेल्या पोटनिवडणूकीत अशोक पाटील यांचा उमेदवार २० मतांनी विजयी झाला, हे त्याचे उदाहरण असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. सध्या अशोक पाटील यांच्या पॅनेल मधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुमारे ५० इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येकाची कागदपत्रे तयार करून एका जागेसाठी दोन म्हणजेच १५ जागेसाठी ३० उमेदवारी अर्ज भरले जाणार असून नंतर १५ अर्ज मागे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे अशोक पाटील समर्थक सांगत आहेत.

सरपंच पदाची तगडी लढत होणार

गेल्या निवडणुकीत अशोक पाटील यांच्या पॅनेलमधील सरपंच पदाच्या उमेदवाराचा सुमारे ४५० मतांनी निसटता पराभव झाला. यंदाच्या वेळी अशोक पाटील यांनी या जागेसाठी जोर लावला आहे. अशोक पाटील यांच्या पॅनेल मधून सध्या तरी चार नावे चर्चेत आहेत. मात्र डॉ. मदन शेटे हेच नाव अंतिम केले जाण्याची शक्यता आहे. पीआर पाटील गटातील सरपंच पदाचे नाव अद्याप तरी गुलदस्त्यातच असल्याचे दिसते. या जागेवर तगडी लढत होईल अशी चर्चा आहे.

पीआर पाटलांचे ऐनवेळी बाहेरील मतांना प्राधान्य

कुरळप गावातील अनेक जण नोकरीसाठी इतर गावी स्थलांतरित झाले आहेत. निवडणुकीत या मतदारांना ये-जा करण्याची सोय पीआर पाटील करत असतात. त्याचा त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा होत आहे. सध्या अशोक पाटील हे देखील आव्हान देत आपल्या कार्यकर्त्यांची योग्य सोय करून बाहेरील मतांना प्राधान्य देतील अशी चर्चा आहे. त्याचा निवडणुकीत दोघानांही किती फायदा होईल हे पाहावे लागणार आहे.

  • प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज.
  • मो. नं – ७३५०२६६९६७
Share to