चिकुर्डे ग्रामपंचायतीत घुमणार पुन्हा ‘आबा आबा.. धुमधडाका’
- राष्ट्रवादीला मिळेना प्रबळ विरोधक ; अभिजित पाटील हॅटट्रिक करणार ?
महाईन्यूज ! प्रदीप लोखंडे
सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे ग्रामपंचायतमध्ये गेल्या १० वर्षांपासून अभिजित पाटील यांची निर्विवाद सत्ता आहे. पाटील सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाप्रमुख आहेत. पक्षाकडून त्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. गावात गटतट आणि कणखर नेतृत्वाअभावी राष्ट्रवादी बॅककफूटवर पडली आहे. अभिजित पाटलांना प्रबळ विरोधकच शिल्लक राहिला नाही. परिणामी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही अभिजित पाटील पॅनेलचीच सत्ता येईल, अशी चर्चा आहे. तसे झाले तर गावात सत्तेची हॅटट्रिक होऊन ‘पुन्हा आबा..आबा..धुमधडाका’ चा आवाज घुमेल, हे मात्र नक्की.
चिकुर्डे हे जिल्हा परिषद मतदारसंघ असणारे गाव आहे. या गावातून जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून दिला जातो. गावची लोकसंख्या ८ हजार २५२ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला ६ वॉर्ड मधून १७ ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले जातात. तर एक लोकनियुक्त सरपंच निवडला जातो. दोन वेळच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांना गावात सत्ता आणण्यात यश आले आहे. गेली १० वर्षे त्यांच्या विचारांचा सरपंच निवडून येत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी आणि अभिजित पाटील यांनी गावातील निवडणूक बिनविरोध केली. याला केवळ ५ नंबर वॉर्ड अपवाद राहिला. या वॉर्डात माजी सैनिक आनंदराव सरनाईक (फौजी बापू) यांनी अभिजित पाटील यांच्या उमेदवारापुढे निवडणूक लढवून ते विजयी देखील झाले. इतर जागांवर बिनविरोध करताना अभिजित पाटील पॅनेलकडे सरपंच पद तर राष्ट्रवादीकडे उपसरपंच पद देण्यात आले. यंदाची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणुकीला सामोरे जावे लागणार हे पाहावे लागणार आहे.
गावात अभिजित पाटील आणि सोमराज देशमुख यांच्यात नेहमी लढत होते. सध्या राष्ट्रवादीच्या सोमराज देशमुख यांना राजकारणात विशेष रस दिसत नाही. अनेक निवडणुकांकडे त्यांनी कानाडोळा केला आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी अभिजित पाटील यांच्याशी समझोता करत निवडणूकच बिनविरोध केली. सध्या राष्ट्रवादीत फाटाफूट झाली असून गटतट निर्माण झाले आहेत. अभिजित पाटील यांना तगडा विरोधक गावात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा गावात अभिजित पाटील यांचेच पॅनेल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाची भूमिका गुलदस्त्यात –
माजी आमदार शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत आल्याने चिकुर्डे गावातील त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसह अनेक निवडणुकीत माजी आमदार नाईक समर्थक आणि अभिजित पाटील यांच्यात खटके उडाले आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय भूमिका घ्यावी, हे अद्याप नाईक गटाकडून उघड करण्यात आले नाही. त्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने विरोधक देखील संभ्रमात आहेत.
राष्ट्रवादी निवडणूक लावण्याची शक्यता –
गेल्या १० वर्षांपासून गावात अभिजित पाटील यांची सत्ता असून त्यांचा सरपंच निवडून दिला जात आहे. यंदाच्या वेळी राष्ट्रवादीचा सरपंच हवा, असे पक्षातील काही गटाचे म्हणणे आहे. एकाच पक्षाचा सरपंच असल्याने काही लोकांमध्ये खदखद असल्याची चर्चा आहे. त्यासाठी या वेळी निवडणूक लावण्याच्या विचारात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. सगळे गट एकत्र येण्याच्या विचार करत आहेत. मात्र ऐनवेळी काय निर्णय होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
- मो. नं – ७३५०२६६९६७