पुण्यामध्ये ढोल-ताशा पथकांतील वादकसंख्या 25 हजारांहून अधिक – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
पुणे – ढोल-ताशा वादनादरम्यान वादक तल्लीन होऊन वादन करीत असतात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आनंद पाहण्यासारखा असतो. पुण्यामध्ये ढोल-ताशा पथकांतील वादकसंख्या 25 हजारांहून अधिक असून विविध वयोगटांचे वादक आहेत. त्यामुळे ढोल-ताशा हे पुण्याच्या गणेशोत्सवातील आकर्षक असल्याचे, मत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.
ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे एकत्रित वाद्यपूजनाचा कार्यक्रम बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते वाद्य आणि ध्वज पूजन झाले. कार्यक्रमाला तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, बाळासाहेब मारणे, नितीन पंडित, विवेक खटावकर, रवींद्र माळवदकर, दत्ता सागरे, धीरज घाटे, डॉ. मिलिंद भोई, आनंद सराफ, सुरेश पवार, ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते. यावर्षी प्रथमच पोलीस आयुक्तांच्या हस्ते वाद्यपूजन झाले.
“पोलिसांच्या सूचना अनेकदा स्थानिक पोलीस स्टेशन किंवा चौक्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या सूचना त्यांच्यापर्यंत योग्यरितीने आणि वेळेत गेल्यास गणेशोत्सव मंडळे आणि ढोल-ताशा पथकांना सोयीचे होईल. आजपर्यंत दोन ते अडीच कोटी रुपयांची मदत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पथकांनी केली आहे. कोविडमुळे दोन वर्षे गणेशोत्सवातील मिरवणुका झाल्या नाहीत. यंदा त्या मिरवणुका आणि गणेशोत्सव जोरात आणि सवाद्य निघाव्या. पथकांनी वादनामध्ये नावीन्य आणणे देखील गरजेचे आहे,’ असे ठाकूर यांनी सांगितले.
महासंघाचे अमर भालेराव, अनुप साठये, केतन देशपांडे, संजय सातपुते, ओंकार कळढोणकर, प्रकाश राऊत, अतुल बेहेरे, आशुतोष देशपांडे, विलास शिगवण, ऍड.शिरीष थिटे, अक्षय बलकवडे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पुनीत बालन यांनी मनोगत व्यक्त केले. संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. पंडित यांनी आभार मानले.