रामदास कदम यांचा शिवसेनेला अखेरचा रामराम, बाळासाहेब असते तर… खेद व्यक्त करत दिला राजीनामा

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच कट्टर समर्थक म्हणून ओळखणारे रामदास कदम यांनीही पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी आपण पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे. यामध्ये रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंवर केला आहे. एवढंच नाही तर रामदास कदमांनी राजीनामा देण्यामागील कारणंही पत्रात सांगितली आहेत.

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळालं,” असे म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली आहे. “आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम आपल्याकडून कधीच झाले नाही. उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले,” असेही रामदास कदम यांनी पत्रात म्हटले आहे.

“विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणतीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मीडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही,” असेही रामदास कदम या पत्रात म्हणतात.

“मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक्ष शिवसैनिक याचा साक्षीदार आहे,” असे कदम यांनी आपलं शिवसेनेसोबत असणारं नातं सांगताना म्हटले आहे.

“२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत सरकार बनवत होतात त्यावेळीही मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्यावेळी माझं ऐकलं नाही. याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे,” असे रामदास कदम म्हणाले आहेत.

रामदास कदम यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने मागील अनेक दशकांपासून पक्षासोबत असणारा आणखीन एक नेता पक्षापासून दूर गेला आहे. आता रामदास कदम शिंदे गटासोबत जातात का हे येणारा काळच सांगेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Share to