जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात रात्रभर चकमकी सुरु होत्या. या चकमकीत जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली.

पुलवामा जिल्ह्यात रविवारी रात्री गुंडीपोरा परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी परिसराला घेराव घातला होता. शोध मोहीम सुरू असताना अचानक चकमक सुरू झाली. रात्रभर झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. त्यानंतर काही वेळात अन्य एका दहशतवाद्याला मारल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी सकाळी दिली आहे. सुरक्षा दलाने दोन एके बंदुका जप्त केल्या आहेत. पुढील शोधमोहीम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती देताना काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी रविवारी रात्री सांगितलं की, “भारतीय सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना घेरलं आहे. यामध्ये कॉन्स्टेबल रियाझ अहमदच्या मारेकऱ्याचा देखील समावेश आहे. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.” कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांची १३ मे रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

Share to